महायुतीची महत्त्वाची बैठक रद्द, शिंदे गावी गेले, राज्यात काय चाललंय? वाचा 10 महत्त्वाचे पॉईंट्स

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गावी निघून गेल्यानं राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे. राज्याचा नवा मुख्यमंत्री कधी ठरणार? हा प्रश्न अनेकांना पडलाय. 

जाहिरात
Read Time: 3 mins
देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंंत्रीपदालाठी आघाडीवर आहे.
मुंबई:

महायुतीची आज (शुक्रवार 29 नोव्हेंबर)  मुंबईत होणारी बैठक रद्द झाली आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्यातील गावी निघून गेले आहेत. त्यामुळे ही बैठक रद्द झालीय. त्याचबरोबर शिवसेना आमदारांची होणारी बैठक देखील रद्द करण्यात आलीय. आता दोन दिवसांनंतर महायुतीची बैठक होईल अशी शक्यता आहे. यापूर्वी गुरुवारी (28 नोव्हेंबर) रात्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात बैठक झाली.

अमित शाहांच्या निवासस्थानी झालेली बैठक सकारात्मक झाल्याची माहिती शिंदे यांनी नवी दिल्लीत दिली होती. या बैठकीनंतरच शुक्रवारी मुंबईत महायुतीची बैठक होणार होती. पण, या बैठकीच्यापूर्वीच शिंदे गावी निघून गेले. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे. राज्याचा नवा मुख्यमंत्री कधी ठरणार? हा प्रश्न अनेकांना पडलाय. 

( नक्की वाचा : EVM तर फक्त बहाणा, काँग्रेसला निवडणूक निकालापूर्वीच लागली होती पराभवाची चाहूल, सत्य उघड )
 

राज्याच्या राजकारणात कोणकोणत्या घडामोडी गेल्या 24 तासांमध्ये घडल्या आहेत हे समजून घेऊया

  1. महायुतीच्या घटकपक्षांची मुंबईत होणारी महत्त्वाची बैठक रद्द करण्यात आली आहे. त्याचबरोबर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाची बैठकही रद्द झालीय. 
  2. एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्यातील त्यांच्या गावी रवाना झाले आहेत. त्यामुळे या बैठका रद्द झाल्या आहेत. शिंदे अचानक गावी निघून गेल्यानं ते सत्तास्थापनेबाबत सुरु असलेल्या चर्चांवर समाधानी नाहीत का? हा प्रश्न विचारला जात आहे. 
  3. राज्याचा नवा मुख्यमंत्री ठरवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सहकार्य करणार असल्याचं शिंदे यांनी यापूर्नीच जाहीर केलंय. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये सर्वात आघाडीवर आहे. 
  4. नवी दिल्लीमध्ये गुरुवारी झालेली बैठक सकारात्मक झाल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं. त्याचबरोबर राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा निर्णय मुंबईत होणाऱ्या महायुतीच्या बैठकीत होईल, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्याचबरोबर नव्या मंत्रिमंडळाच्या स्थापनेत आपला कोणताही अडथळा नसल्याचंही शिंदे यांनी आवर्जून सांगितलं. 
  5. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाबाबत सहमती झाली आहे. पण, मंत्र्यांच्या संख्येचा मुद्दा अद्याप प्रलंबित आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 
  6. NDTV ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हा फॉर्म्युला यापुढेही कायम असेल. पण, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्विकारण्यास उत्सुक नाहीत, अशी माहिती त्यांच्या पक्षाचे आमदार संजय शिरसाट यांनी PTI ला बोलताना दिली. मुख्यमंत्रीपद सांभाळलेल्या व्यक्तीनं उपमुख्यमंत्री होणं योग्य नसल्याचं त्यांनी सांगितलं. 
  7. भाजपा गृहखातं आपल्याकडंच कायम ठेवण्याची शक्यता आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थ खातं मिळू शकतं. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम ही दोन खाती मिळू शकतात. 
  8. भाजपाला 22 कॅबिनेट मिळण्याची शक्यता आहे. तर शिवसेना आणि राष्ट्रवादीला अनुक्रमे 12 आणि 9 खाती मिळतील, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. 
  9. महायुती सरकारचा शपथविधी 2 डिसेंबरला होणार असल्याचं सुत्रांनी सांगितलं. 
  10. भाजपाच्या नेतृत्त्वाखालील महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीत 288 पैकी 230 जागांवर विजय मिळवलाय. भाजपानं सर्वाधिक 132 जागा जिंकल्या आहेत. तर शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं अनुक्रमे 57 आणि 41 जागांवर विजय मिळवलाय. 

Topics mentioned in this article