मराठा आरक्षणाचा विषय आता वेगळ्याच वळणाकडे चालल्याचे सध्या दिसत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या भूमिके विरोधात अपक्ष आमदार राजेंद्र राऊत हे बार्शीत आजपासून आंदोलनाला बसणार आहेत. जरांगे यांनी जाहीर पणे भाजप विरोधात भूमिका घेतली आहे. शिवाय देवेंद्र फडणवीसांनाही त्यांनी लक्ष्य केले आहे. त्यांची वक्तव्य ही मविआला समर्थन करणारी असतात असा दावा राऊत यांनी केला आहे. तर दुसरीकडे मराठा समाजा पुढे चार पर्याय असल्याचे समाजाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी सांगितले आहे. शिवाय जरांगे आणि राऊत यांनी समन्वयाची भूमिका घ्यावी असे आवाहनही त्यांनी केला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राजेंद्र राऊत हे बार्शीचे अपक्ष आमदार आहेत. त्यांनीही आता मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा मार्ग पत्करला आहे.शिवाय मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेचाही त्यांनी विरोध केला आहे. ते मविआला पोषक भूमिका घेतात असा त्यांचा आरोप आहे. शिवाय मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी ही त्यांनी केली आहे. यासाठी ते ठिय्या आंदोलन करत आहेत. गेल्या काही दिवसापासून मनोज जरांगे पाटील आणि आमदार राजेंद्र राऊत यांच्यात शाब्दीक खटके उडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज ते ठिय्या आंदोलन करत आहे. त्यांच्या या वादात आता मराठा अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनीही उडी घेतली आहे. त्यांनी चार पर्यायही जरांगे पाटील यांना देवू केले आहेत.
ट्रेंडिंग बातमी - एमआयएम मविआचं चाललंय काय? दानवे-जलील यांचे दावे प्रतिदावे
बाळासाहेब सराटे यांनी मनोज जरांगे यांना चार पर्याय देवू केले आहेत. शिवाय त्यांनी समन्वयाची भूमिका घेणे गरजेचे असल्याचं म्हटलं आहे. राऊत आणि जरांगे यांचा उद्देश मराठा आरक्षण आहे. त्यामुळे ते परस्पर विरोधी भूमिका घेणार नाही असेही ते म्हणाले. जरांगेंनी आणखी व्यापक होण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली. त्यांनी इतरांची मते ही विचारात घेण्याची गरज आहे. शिवा. देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली जाणारी वैयक्तीक टीका त्यांनी टाळायला हवी असेही ते म्हणाले. जरांगे यांनी वेळोवेळी देवेंद्र फडणवीस आणि भाजप विरोधात भूमिका घेतली आहे. भाजपचे उमेदवार पाडायचे असेही त्यांनी सांगितले आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात थेट राजकारण नको असेही ते म्हणाले. शिवाय मराठा समाजा समोर कोणते चार पर्याय आहेत ते ही त्यांनी स्पष्ट केले.
सराटे यांचे जरांगे यांना चार पर्याय
1 महाविकास आघाडीचे नेते आणि पक्षांकडून मराठा आरक्षणाच्या मागण्या अपेक्षेप्रमाणे मंजूर करून घेण्याची खात्री करून त्यांना संपूर्ण पाठिंबा देणे.
2 महायुती सरकार कडून सगळ्या मागण्या मंजूर करून घेण्याची खात्री करून महायुतीला संपूर्ण पाठिंबा देण.
3 मराठा समाजाचा अंजेंडा घेऊन एक स्वतंत्र राजकीय पक्ष निर्माण करून छत्रपती संभाजीराजे, आ. बच्च्यू कडू, संभाजी ब्रिगेड इ. सर्व लोकाभिमुख घटकांना सोबत घेऊन तिसरा समर्थ पर्याय उभा करणे. थेट निवडणूक लढवून मनोज जरांगे पाटील यांना मुख्यमंत्री करणे. त्यांच्या मागणीप्रमाणे सगळे प्रश्न सोडविणे.
4 मराठा समाज म्हणून कोणतीही राजकीय भूमिका न घेता मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आंदोलनाने केवळ सामाजिक लढ्याची भूमिका घेऊन निवडून येईल त्या सरकारकडून मराठ्यांचे प्रश्न सोडविणे.
ट्रेंडिंग बातमी - सहा वर्षाच्या चिमूरडीमध्ये मासिक पाळीची लक्षणं,नक्की तिच्या सोबत काय झालं?
वरील चार पैकी कोणतीही एक भूमिका घेऊन वाटचाल केल्यास किमान समाजाची प्रतिष्ठा राहील आणि समाजाला आरक्षणही मिळेल असे सराटे यांनी म्हटले आहे. यापैकी एकही भूमिका पूर्णपणे न घेता वेगळा कोणताही मार्ग मराठा समाजाच्या उपयोगाचा ठरणार नाही. त्यातून मराठा समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत. उलट समाजात दुफळी निर्माण होण्याची शक्यता आहे. वरील चारपैकी कोणता पर्याय निवडावा यावरही समाजाच्या अनुभवी व माहितगार प्रतिनिधीशी साधकबाधक सामूहिक चर्चा झाली पाहिजे. काही तरी ठोस आणि निश्चित भूमिका घेतली तरच मराठा समाजासाठी काही साध्य होऊ शकते, असे ते म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world