शुभम बायस्कर, प्रतिनिधी
Amravati Political News Today : अमरावतीत भाजप आणि राणा दाम्पत्यामधील म्हणजेच नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यातील राजकीय संघर्ष आता एका नव्या वळणावर पोहोचला आहे. अमरावती शहरात भाजपकडून आता राणा दाम्पत्याची चहुबाजूने नाकेबंदी करण्याची जोरदार रणनीती आखली जात आहे,अशी माहिती आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सोहळ्यात खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी आमदार प्रवीण पोटे यांच्या उपस्थितीत एक मोठी राजकीय घोषणा केली आहे.
राणा दाम्पत्याच्या मनसुब्यांवर पाणी फिरवले जाणार
दरवर्षी गोकुळाष्टमीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत राणा दाम्पत्याकडून भव्य दहीहंडीचे आयोजन करून तरुणाईला आकर्षित करण्याचा मोठा प्रयत्न केला जातो. मात्र,यावर्षी भाजप स्वतः अमरावतीत अत्यंत भव्य आणि दणकेबाज दहीहंडी साजरी करणार असल्याचे आवाहन खासदार अनिल बोंडे यांनी केले आहे."दहीहंडी कुठे आणि कशी घ्यायची,हे महापौर आणि आमदार प्रवीण पोटे यांनी ठरवावे",असे निर्देश देत बोंडेंनी थेट राणांच्या पारंपरिक राजकीय इव्हेंटलाच आव्हान दिले आहे.या नव्या रणनीतीमुळे दरवर्षी दहीहंडीच्या माध्यमातून तरुणाईला आकर्षित करणाऱ्या राणा दाम्पत्याच्या मनसुब्यांवर भाजपकडून पाणी फिरवले जाणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
नक्की वाचा >> Pune News: माळशेज घाटात पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण, एका घटनेमुळं पोलिसांचीही उडाली धावपळ, Video व्हायरल
यावेळी आमदार राजेश वानखडे,आमदार प्रताप अडसड,महापौर श्रीचंद तेजवानी,माजी आमदार रमेश बुंदिले,भाजप जिल्हाध्यक्ष प्रभुदास भिलावेकर,तुषार भारतीय,निवेदिता चौधरी,चेतन गावंडे,किरण पातुरकर,शिवराय कुलकर्णी,दिनेश सूर्यवंशी,नितीन गुडधे,शिक्षक नेत्या संगीता शिंदे,नितीन धांडे,डॉ.वसुधा बोंडे, माजी सभापती विक्रम ठाकरे,अचलपूर नगराध्यक्ष रुपाली माथने,सुवर्णा वरखेडे,नगरसेविका डॉ.मधुरा काहाळे,डॉ.विलास कविटकर,प्रियंका मालठाने यांच्यासह भाजपचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.