
लोकसभा निवडणुकीत सांगलीची चर्चा जोरदार झाली. काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील यांनी मुसंडी मारत विजय मिळवला. आता ते विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. त्यानिमित्ताने ते तासगाव मतदार संघात आले होते. हा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आर. आर. पाटील यांचा मतदार संघ आहे. इथून रोहीत पाटील रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. असं जरी असलं तरी विशाल पाटील यांनी आपला पाठींबा मात्र माजी मंत्री अजित घोरपडे यांना दिला आहे. त्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. शिवाय त्यांनी यावेळी माजी खासदार संजयकाक पाटील यांचा उल्लेख राक्षस असा करत एक खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे सांगलीचे वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघात माजी मंत्री अजित घोरपडे यांच्या पाठीशी राहण्याचा निर्धार जाहीर केला आहे. तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात अजितराव घोरपडे यांच्या शिवाय पर्याय नाही असे ते म्हणाले आहे. शिवाय राक्षसाला गाडायचे आहे, अशी टीका माजी खासदार संजयकाका पाटील यांच्यावर त्यांनी केली आहे. लोकसभेतील अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या विजया निमित्ताने तासगावच्या मनेराजुरी येथे विशाल पाटील यांचा भव्य सत्कार सोहळा झाला. माजी मंत्री अजित घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
त्या निमित्ताने शेतकरी मेळावा देखील पार पडला. यावेळी बोलताना अजित घोरपडे यांनी माजी खासदार संजयकाका पाटील यांच्यावर सडकून टीका केली. लोकसभा निवडणुकीत एका अपक्षाने राक्षसरूपी खासदाराचा पराभव केला. तरी आता विधानसभा निवडणुकीची तयारी करतायत. पण या राक्षसाला पाडायचे असेल तर तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघात अजितराव घोरपडे यांच्याशिवाय पर्याय नाही असे पाटील म्हणाले.
ट्रेडिंग बातमी - कोल्हापूर दक्षिणमध्ये कोण बाजी मारणार? महाडिक विरुद्ध पाटील सामना रंगणार
विशाल पाटील जरी अपक्ष म्हणून निवडून आले असले तरी ते काँग्रेसचे आहेत. महाविकास आघाडीत आहेत. हा मतदार संघ आघाडीत राष्ट्रवादी शरद पवार गटाला जाण्याची शक्यता आहे. शिवाय हा मतदार संघ हा दिवंगत आर. आर. पाटील यांचा मतदार संघ आहे. इथे त्यांचे पुत्र रोहित आर. आर. पाटील हे निवडणूक लढणार आहे. त्यांनी त्या दृष्टीने तयारीही केली आहे. अशात विशाल पाटील यांनी अजित घोरपडे यांना पाठींबा जाहीर केला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पाटील यांना मदत केलेल्या रोहीत पाटील यांच्या विरोधात विशाल पाटील भूमिका घेणार का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world