मान्सूनचं वेळे आधीच महाराष्ट्रात आगमन झालं. मुंबईतही जोरदार पाऊस झाला. पण पहिल्याच पावसात मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले. नागरिकांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागला. याबाबत उपमुख्यमंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आपत्तीमध्ये काम करण्याला आमचं प्राधान्य आहे. आपत्तीचे राजकारण करणाऱ्यांना उत्तरं देत बसणार नाही असे शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यातील सध्याच्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील अद्ययावत अशा राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला भेट देऊन शिंदे यांनी आढावा घेतला त्यानंतर ते बोलत होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आपत्कालीन कार्य केंद्र तंत्रज्ञानाने सुसज्ज असे झाल्याने कोणत्याही आपत्तीत शासनाला योग्य व्यवस्थापन करणे सहज शक्य होईल असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी केंद्रातील प्रशिक्षित कर्मचाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून ते कशा पद्धतीने काम करतात आणि तंत्रज्ञान वापरता याची माहितीही घेतली. शिवाय समाधान व्यक्त केले. यावेळी मदत व पुनर्वसन अपर मुख्य सचिव सोनिया सेठी तसेच सतीशकुमार खडसे यांनी त्यांना कालपासून राज्यभरात सुरु असलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत माहिती दिली. शिवाय कोणत्या उपाययोजना केल्या आहेत याची ही माहिती दिली.
तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा या आपत्ती व्यवस्थापन केंद्रातून पावसाचे तसेच संभाव्य विजा पडण्याचे अलर्ट 9.5 कोटी नागरिकांना पाठविण्यात आल्याची माहिती सोनिया सेठी यांनी यावेळी उपमुख्यमंत्र्यांना दिली. तर ठाणे, रायगड, मुंबई , पुण्यातील घाट विभागात रेड अलर्ट जाहीर करण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले. एनडीआरएफ पथके तसेच इतर बचाव यंत्रणा त्याच प्रमाणे सर्व जिल्हा प्रशासन व पालिकांशी आपत्ती व्यवस्थापन केंद्रांमार्फत सातत्याने संपर्क ठेवला जातो. वेळोवेळीचे अलर्ट त्यांना दिले जातात. त्यामुळे कुठेही बचाव कार्य किंवा मदत पोहचवायची असेल तर लगेच ते करता येते असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - Maharashtra Rain : नागरिकांनो घरातच थांबा, मुंबईसह 'या' 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट
यावेळी उपमुख्यमंत्री यांनी केंद्रातील तज्ञ, तसेच तांत्रिक कर्मचाऱ्यांकडून प्रत्यक्ष व्यवस्था कशी काम करते ते जाणून घेतले. हे कर्मचारी 24 तास काम करतात. त्यांची राहण्याच्या व्यवस्था आणि इतर अडचणी तत्काळ दूर करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधितांना दिले. ठाण्याच्या धर्तीवर आपत्ती प्रतिसाद दले सर्व महानगरपालिकांमध्ये तत्काळ नियुक्त करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी प्रधान सचिव नगरविकास डॉ गोविंदराज यांना दिले. कोकण आपत्ती सौम्यीकरणाची किती कामे पूर्ण झाली आहेत त्याचा आढावाही त्यांनी घेतला.
दरम्यान मुंबईत तुंबल्यावर आदित्य ठाकरे यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. गेल्या 3 वर्षांपासून बीएमसीवर नियंत्रण ठेवणाऱ्या भाजप सरकारच्या पूर्ण उदासीनतेमुळे आज मुंबई ठप्प झाली आहे असा आरोप आदित्य यांनी केला. मुंबईमध्ये अशा ठिकाणी पाणी साचले आहे जिथे पूर्वी कधीही पाणी साचले नव्हते. 2021/22 मध्ये आपण ज्या हिंद माताला पाणी साचण्यापासून मुक्त केले होते, तीथे आज पुन्हा पाणी साचले आहे, कारण बीएमसीने वेळेवर पाणी उपसण्याची प्रक्रिया सुरू केली नाही, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.