विरोधकांनी महायुतीच्या चहापानावर बहिष्कार टाकला. त्यामुळे ते सत्ताधाऱ्यांच्या चहापानाला गेलेच नाहीत. या पार्श्वभूमीवर महायुतीची पत्रकार परिषद झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जोरदार टोलेबाजी केली. विरोधकांच्या प्रत्येक आरोपाला प्रत्युत्तर दिले जाईल. त्यांची संख्या जरी कमी असली तरी आम्ही त्यांना कमी लेखणार नाही, असे देवेंद्र फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलं. शिवाय मंत्र्यांच्या खाते वाटपाची घोषणा पुढील दोन तीन दिवसात केली जाईल असंही फडणवीसांनी सांगितलं. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तर अजित पवारांनी विरोधकांच्या भूमिकेवरच शंका उपस्थित केली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकत काही सरकारबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला सभागृहात उत्तर दिलं जाईल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. विरोधक ईव्हीएमबाबत प्रश्न उपस्थित करत आहे. सध्या त्यांच्याकडून ईव्हीएमबाबत नरेटिव्ह पसरवलं जात आहे. हा विजय ईव्हीएमचा असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी या पत्रकार परिषदेत उत्तर दिलं आहे. हा विजय ईव्हीएमचाच असल्याचे ते म्हणाले. शिवाय ईव्हीएमचा अर्थही त्यांनी सांगितला आहे. ते म्हणाले ईव्हीएम म्हणजे एव्हरी वोट फॉर महाराष्ट्र असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे हा महाराष्ट्राच्या जनतेचा विजय असल्याचे त्यांनी सांगितले.
हे सरकार संविधानानुसार काम करेल. परभणीत झालेली घटना वेदनादायी आहे. बीडमध्ये झालेल्या हत्येबाबतही विरोधकांनी प्रश्न उपस्थित केला आहे. त्यालाही उत्तर दिले जाईल असं फडणवीस म्हणाले. विरोधकांची संख्या कमी आहे. पण आम्ही त्यांचा नक्कीच सन्मान करू. पण त्यांनी लोकसभे प्रमाणे सभागृहातून पळ काढू नये. सभागृहात चांगली चर्चा करावी असे आवाहन त्यांनी केले. विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय हा विधानसभा अध्यक्ष घेतली. ते जो निर्णय घेतील त्याला सरकारचा पाठिंबा असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. मंत्र्यांच्या कामाचे ऑडीट होणार असल्याचंही फडणवीस म्हणाले. महिलांनाही मंत्रिमंडळात स्थान दिलं असल्याचं त्यांनी सांगितलं. शिवाय पुढच्या दोन तीन दिवसात खातेवाटप होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. घटकपक्षांनाही संधी दिली जाईल असे फडणवीस म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - सरपंच ते एकनाथ शिंदेंचे विश्वासू! कसा राहिलाय भरत गोगावलेंचा प्रवास?
या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. चहापानावर बहिष्कार टाकण्याचा अलिकडच्या काळात पायंडा पडल्याचा दिसतोय. आता चहापानाचा कार्यक्रम करावा की न करावा याचा विचार करावा लागणार आहे असं अजित पवार म्हणाले. विरोधक संख्येने कमी असले तरी महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न पुढे आले तर त्याची उत्तरं दिली जातील असं अजित पवार म्हणाले. आम्हाला प्रचंड बहुमत आहे. म्हणून सभागृह रेटून चालवलं जाणार नाही असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं. विरोधक कमी संख्येने आहेत म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जाणार नाही याची ग्वाही त्यांनी या निमित्ताने दिली.
ट्रेंडिंग बातमी - हिवाळी अधिवेशन! विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार, 'ही' दिली कारणं
तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत. देवेंद्र फडणवीस यांच्या मागे मी खंबिरपणे उभा आहे. प्लेअर तेच आहेत. पण मॅच मात्र नवी आहे असं शिंदे म्हणाले. मी सांगितलं होतं आम्ही दोघे मिळून 200 आमदार निवडून आणू. पण 238 आले. अजितदादा आल्यामुळे बोनस मिळाला. विरोधकांनी आम्हाला हलक्यात घेतले. त्यामुळे त्यांची ही अवस्था झाली आहे. पण आम्ही त्यांना हलक्यात घेणार नाही. अडीच वर्षासाठी मंत्रिपद हे आम्ही सर्वांनी मिळून ठरवलं आहे. त्यामुळे जो चांगलं काम करेल त्यांला पुढे संधी दिली जाईल असंही शिंदे यांनी स्पष्ट केलं. उद्धव ठाकरे यांना आता हिंदूत्व आठवत आहे. पण हिंदूत्व म्हणजे काय टी-शर्ट आहे का? असा प्रश्न त्यांनी यावेळी केला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world