एकनाथ शिंदेंनी बंड केलं. त्या बंडात सर्वात पुढे कोण होतं असं विचारलं तर पहिलं नाव हे भरत गोगावले यांचे येतं. त्यामुळे शिंदेंच्या मंत्रिमंडळात त्यांना संधी मिळेल अशी जोरदार चर्चा होती. पण शेवटपर्यंत त्यांना संधी मिळाली नाही. मंत्री म्हणून शपथ घेण्यासाठी कोट शिवूत तयार असल्याचं त्यांनी अनेक वेळा सांगितलं. त्यावरून त्यांची मस्करीही झाली. पण त्यांना तो घालण्याची संधी मिळालीच नाही. पण आता गोगावलेंना देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून संधी मिळाली आहे. गोगावले हे एकनाथ शिंदे यांचे विश्वासू समजले जातात. गोगावले यांचा सरपंच ते मंत्रिपदाचा प्रवास हा अत्यंत संघर्षमय राहीला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सरपंच ते आमदारकीचा प्रवास
भरत गोगावले यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. त्यांचे वडील हे शेतकरी होते. महाड तालुक्यातील दुर्गम ठिकाणी असलेलं पिंपळवाडी हे त्यांचं गाव. 1 जुन 1963 मध्ये त्यांचा जन्म झाला. पुढे ते बिरवाडीच्या ढालकाठी इथे स्थायिक झाले. तिसरीत असताना ते नापास झाले. त्यानंतर मुंबईत गेले. तिथे त्यांनी नववी पर्यंतचं शिक्षण घेतलं. मात्र परत ते गावाकडे परतले. त्यांना सामाजिक कार्याची आवड होती. त्यातूनच त्यांनी 1987 साली ग्रामपंचायत निवडणूक लढवली. शिवाय ते पिंपळवाडीचे सरपंचही झाले. त्यानंतर गोगावले यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही.
काँग्रेसकडे मागितली होती उमेदवारी
1992 साली भरत गोगावले यांना पंचायत समितीची निवडणूक लढवायची होती. त्यासाठी त्यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. पण त्यांना काँग्रेसने त्यावेळी उमेदवारी नाकारली होती. त्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढली आणि ती जिंकली. पुढे 1996 साली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 1997 साली जिल्हा परिषदेची निवडणूक लढली आणि जिंकली. दोन वेळा ते जिल्हा परिषदेचे सदस्य झाले. त्यावेळी त्यांनी कृषी, पशुसंवर्धन सभापती, अर्थ व बांधकाम सभापती म्हणून ही काम केलं. महाड विधानसभा मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. प्रभाकर मोरे यांनी सलग तीन वेळा या मतदार संघातून विजय मिळवला होता. मात्र 2004 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्याच वेळी महाडमध्ये भरत गोगावले यांचा उदय झाला.
ट्रेंडिंग बातमी - वडील काँग्रेसकडून 5 वेळा आमदार, आता लेकीला मंत्रिपद; कोण आहेत मेघना बोर्डीकर?
आमदारकीची पहिली निवडणूक
2009 साली शिवसेनेनं प्रभाकर मोरे यांना उमेदवारी नाकारली. त्यांच्या ऐवजी मतदार संघात वजन वाढत असलेल्या भरत गोगावले यांना उमेदवारी दिली. त्यांनी तत्कालीन आमदार माणिक जगताप यांचा पराभव करत 2009 साली पहिल्यांदा विधानसभा गाठली. त्यानंतर सलग चार वेळा भरत गोगावले हे मोठ्या मताधिक्याने विधानसभेत गेले. त्यांनी मतदार संघातून सलग चार वेळा विजयी होण्याचा विक्रमही आपल्या नावावर केला आहा. त्यांनी माणिक जगताप यांचा तीन वेळा तर त्यांची कन्या स्नेहल जगताप यांचा एक वेळा पराभव केला आहे.
ट्रेंडिंग बातमी -भाजपकडून या माजी मंत्र्यांचा पत्ता कट? मंत्रिपदासाठी अद्याप वरिष्ठांचा फोन नाही
मंत्रिपदाला मिळाली होती हुलकावणी
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले. त्यावेळी भरत गोगावलेंनी ठाकरेंना साथ देण्या ऐवजी शिंदेंना साथ दिली होती.त्यावेळी त्यांना मंत्रिपद मिळेल असे वाटले होते. पण शेवटपर्यंत त्यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली. आपण मंत्री होणार नक्की होणार असं ते विश्वासाने नेहमीच सांगत होते. पण त्यांना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मंत्री होता आले नाही. पण त्यां एसटी महामंडळाचे अध्यक्षपद मिळाले. इच्छा नसतानाही त्यांनी हे पद स्विकारला आणि सांभाळलेही. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी चौथ्यांदा महाड पोलादपूर मतदार संघातून विजय मिळवला.
भरत गोगावले मंत्री होणार
मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याने भरत गोगावले हे खुश आहेत. आपल्याला मिळालेल्या संधी बद्दल त्यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. आपल्याला कोणतंही खातं मिळालं तरी त्यात आपण चांगले काम करू असे ही ते म्हणाले आहे. त्यांना मंत्रिपद मिळत असल्याने महाड पोलादपूर या त्यांच्या मतदार संघात आनंदाचे वातावरण आहे. एका शेतकऱ्याचा मुलगा, कोणतेही शिक्षण नसतानाही ऐवढ्या मोठ्या पदावर पोहोचतो हा प्रवास नक्कीच थक्क करणारा आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world