जाहिरात

Nana Patole : नाना पटोलेंची शिंदे - अजित पवारांना ऑफर ही मविआ 2 ची नांदी आहे का?

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद सोडल्यानंतर नाना पटोले (Nana Patole) पुन्हा एकदा चर्चेत आहेत.

Nana Patole : नाना पटोलेंची शिंदे - अजित पवारांना ऑफर ही मविआ 2 ची नांदी आहे का?
मुंबई:

योगेश पाटील, प्रतिनिधी

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद सोडल्यानंतर नाना पटोले (Nana Patole) पुन्हा एकदा चर्चेत आहेत. त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना ऑफर दिली आहे. 'आमच्याकडे या आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रिपद देऊ' अशी ऑफर नाना पटोलेंनी होळीच्या निमित्तानं विद्यमान उपमुख्यमंत्र्यांना दिली आहे.

नाना पटोलेंनी 'बुरा ना मानो होली है' असं म्हणत अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना मविआत या आणि मुख्यमंत्री व्हा अशी ऑफर दिलीय. त्यांच्या वक्तव्यानंतर राज्यात कलगीतुरा सुरु झालाय.  महायुतीच्या नेत्यांनी पटोलेंच्या वक्तव्याची खिल्ली उडवलीय. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

सत्ताधारी पक्षाचे नेते नाना पटोलेंच्या वक्तव्याची खिल्ली उडवली असली तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावर नेमकं उत्तर दिलं नाही. त्यामुळे नवा संभ्रम निर्माण झाला. पटोले यांची ऑफर ही मविआ 2 ची नांदी आहे का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

मविआ 2 ची नांदी?

2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीची स्थापना झाली. त्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदाच्या मुद्यावर भाजपा आणि शिवसेना ही युती तुटली. उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी करत मुख्यमंत्रिपद मिळवलं. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केली.

2019 ते 2024 या कालावधीमध्ये राज्याचं संपूर्ण राजकारणच बदललं. शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडली. या पक्षातून एकनाथ शिंदे आणि अजित पवार बाहेर पडले. त्यांनी भाजपाशी हातमिळवणी करत महायुती स्थापन केली. एकनाथ शिंदे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते. महायुतीला 2024 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठं बहुमत मिळलं. या निवडणुकीनंतर भाजपाचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. 

( नक्की वाचा : Inside Story : मायावतींवर टीका, कांशीराम यांचं कौतुक, काय आहे राहुल गांधींचा प्लॅन? )

आकडेवारी काय सांगते?

नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार या जुन्या मित्रांना साद दिल्यानं महाविकास आघाडी 2 (मविआ 2) ची नांदी सुरु झाली आहे. विधानसभेतील सध्याच्या संख्याबळानुसार मविआ 2 प्रत्यक्षात येऊ शकते का हे समजून घेऊया.

सध्या भाजपसह अपक्ष मिळून 132, शिवसेना (एकनाथ शिंदे) 57, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) 41 असं 232 आमदारांचं संख्याबळ महायुतीकडे आहे. दुसरीकडे काँग्रेस 16, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 10, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 10 आणि इतर 2 असे 48 आमदार आहेत.

महाविकास आघाडीमध्ये अजित पवारांचे 41 आणि एकनाथ शिंदे यांचे 57 आमदार सहभागी झाले तरी त्यांचं संख्याबळ हे 146 पर्यंत पोहचू शकते. 288 जणांच्या विधानसभेत हे आवश्यक बहुमतापेक्षा (145) फक्त एकनेच हे संख्याबळ जास्त आहे. 

राजकारणात प्रॅक्टिकल निर्णय घ्यावे लागतात, तिथे भावनांना स्थान नाही. त्यामुळे काँग्रेसने ऑफर दिली तरी ती प्रत्यक्षात येऊ शकते का? हा खरा प्रश्न आहे. जिथे 3 पक्ष एकत्र असून भांड्याला भांडं लागतंय, तिथेच इतके सगळे छोटे-छोटे पक्ष केवळ भाजपला दूर ठेवण्यासाठी एकत्र येऊन सत्ता राखतील का? हा खरा प्रश्न आहे.

नाना पटोलेंना देखील कदाचित याची जाणीव झाली असावी. त्यामुळेच आपल्या वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटताच त्यांनी आपण हे विधान गमतीनं केलं असल्याचं सांगत त्यावर पडदा टाकलाय. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: