Navneet Rana: नाराज नवनीत राणा भाजप सोडणार? 'हिंदू शेरनी' बाबत भाजपचे जेष्ठ नेते काय म्हणाले?

राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी संधी मिळावी म्हणून नवनीत राणा यांनी सुनेत्रा पवार यांची ही भेट घेतली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins
अमरावती:

लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर भाजप नेत्या नवनीत राणा एकाकी पडल्या होत्या. त्यांना त्यानंतर राज्यसभेवर पाठवण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. पण त्यांच्या नशिबी फक्त प्रतिक्षा आली. त्यामुळे त्या पक्षात नाराज असल्याचं बोललं जात होतं. अशा वेळी सध्या राज्यसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली आहे. त्या जागेवर वर्णी लागावी यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले होते. पण त्यांच्या पदरी निराशा आली. त्यामुळे त्या आता भाजपला रामराम करणार अशी चर्चा रंगली आहे. त्यानंतर पक्षातील जेष्ठ नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.   

सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर राष्ट्रवादीने अखेर आपला उमेदवार जाहीर केला आहे. या जागेवर भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांची वर्णी लागेल अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र जागा राष्ट्रवादीकडेच राहिल्याने नवनीत राणा कमालीच्या नाराज झाल्या आहेत. शिवाय त्या भाजप सोडणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तूळात रंगली आहे. या संपूर्ण वादावर आणि नाराजीच्या चर्चांवर भाजपचे  नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीत  उत्तर दिले आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Pune News: तिच स्टाईल, तोच धाक, तोच रुबाब! सुनेत्रा पवारांच्या रुद्रावताराने अजित पवारांची आठवण, Video Viral

त्यांनी या सर्व चर्चांना तूर्तास पूर्णविराम दिला आहे. नवनीत राणा या भारतीय जनता पार्टीच्या अत्यंत निष्ठावान आणि राष्ट्रीय नेत्या आहेत. त्या कट्टर हिंदुत्ववादी असून 'जय श्रीराम, जय हनुमान' म्हणत पक्षाचे काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबत कोणीही संभ्रम निर्माण करू नये. एक निवडणूक हरली म्हणजे सर्व संपत नाही, काही मतांनी पराभव झाला असला तरी आम्ही त्यांना आजही खासदारच मानतो. योग्य वेळी पक्ष त्यांचा विचार करेल, त्या आयुष्यभर भाजपमध्येच राहतील आणि पक्षात त्यांचा मानसन्मान सर्वोच्च राहील, असं बावनकुळे यावेळी म्हणाले. 

नक्की वाचा - Kalyan News: कल्याण स्टेशनसमोर भाड्यावरून राडा! रिक्षा चालकासोबत प्रवाशी भिडले, Video Viral

राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी संधी मिळावी म्हणून नवनीत राणा यांनी सुनेत्रा पवार यांची ही भेट घेतली होती. शिवाय त्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असं ही बोललं जात होतं. पण राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी देण्याचे टाळले. त्यांच्या ऐवजी विदर्भातीलच राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली. त्यामुळे उरल्या सुरल्या अपेक्षा ही संपल्या. त्यात भाजपचा एक गट नवनीत राणा यांच्या विरोधात आहे. त्यामुळे राण या पक्ष बदलणार या चर्चांना उत आला आहे. यावर राणा यांनी मात्र मौन बाळगले आहे. अशा स्थितीत राणांच्या मनात काय आहे हे समजण्यास मार्ग नाही.