राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज (10 जून ) 25 वा वर्धापन दिन आहे. गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवारांच्या (Ajit Pawar) नेतृत्त्वाखालील आमदारांचा मोठा गट महायुतीमध्ये दाखल झाला. अजित पवार यांच्या गटाचा वर्धापन दिन कार्यक्रम मुंबईत झाला. तर, शरद पवार गटाचा वर्धापन दिन कार्यक्रम अहमदनगरमध्ये होतोय. मुंबईतील वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना शरद पवारांचा उल्लेख निघताच अजित पवार भावुक झाले होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले अजित पवार ?
'सर्वांनी खांद्याला खांदा लावून हा पक्ष पुढे आणला. काही नेते आपल्यात नाहीत. शरद पवार यांचंही (Ajit Pawar on Sharad Pawar) पक्ष स्थापनेत मोठं काम आहे. मी त्यांना ही कृतज्ञता व्यक्त करतो. पक्ष स्थापनेवेळी सोनिया गांधी यांचा परदेशी मुद्दा काढला, मात्र त्यावेळी आपल्याला निवडणुकीत कमी वेळ मिळाला. सर्वांनी प्रयत्न केला त्यामुळे आपण इथपर्यंत पोहोचलो, असं अजित पवार यांनी सांगितलं. यावेळी शरद पवारांबद्दल बोलताना अजित पवार चांगलेच भावुक झाले होते.
कोणताही गैरसमज नसताना तो पसरवण्याचं काम काही जण करत होते. आम्ही एकत्र जेवण केलं. आमच्यात काहीही वाद नव्हता. तुमची लोकसभेची एकच जागा आली आहे. तुम्हाला एक मंत्रीपद द्यायचं आहे, असं म्हणाले होते. राज्यसभा देऊन स्वतंत्र कार्यभार दिला जाणार होता. आता दोन खासदार असले तरी जुलैपर्यंत आणखी एक खासदार वाढणार आहे. या निवडणुकीत सुनील तटकरे यांनी लाज राखली, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.
( नक्की वाचा : जागावाटपाचं गुऱ्हाळ लवकर संपवा अन्यथा... राष्ट्रवादीच्या मेळाव्यात भुजबळांचा थेट इशारा )
आपली फुले, शाहू आंबेडकर विचारधारा होती आणि राहिल. पक्षाचा विस्तार करायचा असेल सतत काम करत राहिले पाहिजे येत्या काळात तरूणांना संधी दिली जाईल. काही मंत्र्यांना विधानसभेची जबाबदारी घ्यावी लागेल. नव्या जोमानं पुन्हा उभं राहू, असं अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं.