नितीन गडकरींच्या वाहनाचे स्टेअरिंग भाजपाच्या जुन्या नेत्याच्या हाती, विदर्भात चर्चांना उधाण

Advertisement
Read Time: 3 mins
N
अमरावती:

शुभम बायस्कार, प्रतिनिधी

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी राज्याच्या राजकारणात सक्रिय व्हावे, अशी चर्चा सध्या सुरु आहे. त्याचवेळी गडकरींच्या वाहानाचं स्टेरिंग अमरावतीच्या जुन्या पिढीतील एका मोठ्या नेत्यांच्या हाती आल्याचे पाहायला मिळालं. भाजप नेते तथा अमरावतीचे माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता हे नितीन गडकरींचे चालक झाल्याने सध्या वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे माजी मंत्री जगदीश गुप्ता यांच्या संस्थेतील कार्यक्रमांना उपस्थिती लावण्यासाठी अमरावती दौऱ्यावर आहेत. त्याच दरम्यान जगदीश गुप्ता अध्यक्ष असलेल्या सिपना शिक्षण प्रसारक संस्थेतर्फे अमरावतीत प्रादेशिक चालक प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन नितीन गडकरींच्या हस्ते करण्यात आलं. कार्यक्रम संपल्यावर 'गडकरी आणि गुप्ता' यांनी ओपन वाहनातून या परिसराच निरीक्षण केलं. याच निरीक्षणा दरम्यान दोघांमध्येही दिलखुलास चर्चाही रंगल्या होत्या.

जगदीश गुप्ता हे अमरावतीचे माजी पालकमंत्री. अमरावती विधानसभा व  विधान परिषदेत सर्वाधिक काळ काम केल्याचा अनुभव त्यांना आहे. भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित संस्थांमध्ये गुप्तांच चांगलं वलय आहे. कट्टर हिंदुत्ववादी चेहरा म्हणून गुप्तांनी चांगली ओळख  आहे. गुप्तांना 2012 साली नितीन गडकरींशी संबंध ताणल्यामुळे सक्रिय राजकारणातून बाहेर पडावे लागले होते. 

( नक्की वाचा : शिवाजी महाराजांची माफी, सावरकरांचा उल्लेख, मोदींनी कसं बदललं राज्याचं राजकारण? )

'गडकरी आणि गुप्ता' या दोघांमधील ताणल्या गेलेल्या संबंधाची चर्चा भाऊंचे अनेक निकटवर्तीय खासगीत करतात. त्याच गडकरी आणि गुप्तांनी आज एकत्र वाहनातून केलेला प्रवास, गुप्तांच्या शैक्षणिक संस्थेतील विविध कार्यक्रमांना गडकरींची उपस्थिती ह्या दोन्ही घडामोडी अनेकांना अस्वस्थ करणाऱ्या आहेत.

लोकसभेत भाजपची झालेली गच्छंती, विधानसभेत भाजप विरोधात तयार होत असलेलं वातावरण ही सगळी स्थिती पाहता जुन्या फळीतील जगदीश गुप्तांना गडकरींच्या माध्यमातून भाजप सक्रिय तर करत नाही ना, अशा चर्चा अमरावतीत सुरू झाल्या आहेत. लोकसभेत भाजप बॅक फुटवर गेल्यानंतर जुन्या नेत्यांना सक्रिय करा, त्यांची मदत घ्या अशी सूचना अलीकडेच रा.स्व.संघाने भाजपला केल्याची माहिती आहे. त्या पार्श्वभूमीवर या चर्चांना अधिक बळ मिळत आहे.

Advertisement

( नक्की वाचा : महाराष्ट्रातल्या भाजपाच्या पराभवाची 5 मोठी कारणं काय आहेत? )

कोण आहेत जगदीश गुप्ता?

जगदीश गुप्ता हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी अमरावतीचं पालकमंत्रीपद सुद्धा त्यांनी भूषवलंय. अमरावती विधानसभा आणि विधान परिषदा या राज्याच्या दोन्ही सभागृहात त्यांनी 22 वर्ष अमरावतीचे नेतृत्व केले. ज्येष्ठ नेते प्राध्यापक डॉ. बी.टी देशमुख यांचा कार्यकाळ हा 30 वर्षांचा राहिलाय. त्यानंतर सर्वाधिक काळ हा जगदीश गुप्तांचा आहे. चार वर्ष त्यांनी राज्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली. अमरावती महापालिकेत 15 नगरसेवक असताना त्यांनी सलग चार वेळा अपक्षांच्या मदतीने महापालिकेत सत्ता काबीज केली होती.

महायुतीची जागा कोणाला सुटणार?

विधानसभा निवडणूक महायुती एकत्र  लढवणार आहे. अमरावती विधानसभेत व्यापक जनाधार असलेला चेहरा भाजपकडे नाही.  तेव्हा जगदीश गुप्ता हे अमरावती विधानसभेसाठी प्रबळ दावेदार असल्याचं सांगितलं जातं.

Advertisement

( नक्की वाचा : अबकी बार सव्वाशे पार! विधानसभा निवडणुकीत 125 जागा जिंकण्याचे भाजपचे लक्ष्य )

अमरावतीत काँग्रेसच्या सुलभा खोडके आमदार आहेत. विधान परिषदेत क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांमध्ये त्यांचं नाव आहे. त्यांचे पती हे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे विधिमंडळ समन्वयक आहेत. त्यामुळे अमरावती विधानसभेची जागा अजित पवार गटाला सोडली जाणार आणि सुलभा खोडके यांना उमेदवारी दिली जाणार अशी चर्चा आहे. प्रत्यक्षात महायुतीची जागा कोणाला सुटणार यावर बरच काही अवलंबून असणार आहे.