
बिहारमधील मतदार यादीच्या पुनरावलोकन प्रक्रियेदरम्यान, भागलपूरमध्ये दोन पाकिस्तानी महिला मतदारांचे प्रकरण समोर आले आहे. दोन पाकिस्तानी महिला 60 वर्षांपेक्षा जास्त काळापासून केवळ येथे राहत नाहीत, तर त्यांचे आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्रही बनले आहे. विशेष म्हणजे, या महिला अनेक वर्षांपासून मतदानही करत आहेत. व्हिसाची मुदत न वाढवताही या महिला अनेक दशकांपासून भारतात राहत आहेत. आणखी आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, एक पाकिस्तानी महिला भागलपूरच्या सरकारी शाळेत शिक्षिकाही बनली होती. या प्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालय आणि निवडणूक आयोगाने संपूर्ण अहवाल मागवला आहे. आता पोलीस या महिलांना शोधण्यासाठी ठिकठिकाणी छापे टाकत आहेत, पण त्या सापडत नाहीत.
प्रकरण कसे उघडकीस आले?
भागलपूरमध्ये मतदार यादीच्या पुनरावलोकनादरम्यान हे प्रकरण समोर आले आहे. भागलपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी केली आहे. वृत्तसंस्था एएनआयच्या माहितीनुसार, बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) फरजाना खानम यांनी सांगितले की, त्यांना विभागाकडून पासपोर्ट आणि व्हिसाच्या तपशीलासह माहिती मिळाली होती. त्याच आधारावर चौकशी झाली आणि नंतर कारवाई सुरू करण्यात आली. त्यांनी सांगितले की, यापैकी एका महिलेचे नाव इमराना खानम आहे. जी खूप वयस्कर आणि आजारी आहे. तिचा पासपोर्ट 1956 सालचा असून, व्हिसा 1958 मध्ये जारी झाला होता. केंद्रीय गृह मंत्रालयाने 11 ऑगस्ट रोजी स्थानिक निवडणूक कार्यालयाला तात्काळ चौकशी आणि कारवाईचे आदेश देऊन नोटीस पाठवली होती.
पाकिस्तानात हद्दपार केले जाऊ शकते
दोन्ही महिलांना कायदा मोडल्यामुळे आणि अवैध पद्धतीने येथे मतदार प्रमाणपत्र बनवून लपून राहिल्यामुळे, त्यांना त्यांच्या मूळ देश पाकिस्तानात हद्दपार केले जाऊ शकते. त्यांच्याविरुद्ध 'विदेशी अधिनियम'चे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हाही दाखल केला जाऊ शकतो. सध्या, भागलपूरचे जिल्हाधिकारी डॉ. नवल किशोर चौधरी यांनी फॉर्म-7 अंतर्गत त्यांची नावे मतदार यादी आणि आधार यादीतून काढण्याचा प्रस्ताव दिला आहे. व्हिसाची मुदत वाढवून न घेता अनेक वर्षांपासून येथे राहत असलेल्या या दोन्ही पाकिस्तानी महिलांवर देशातून हद्दपार करण्यासह इतर कारवाई केली जाईल.
कजरैलीच्या व्यक्तीवर प्रेम झाले आणि इमराना इथेच राहिली
1956 मध्ये पाकिस्तानातून आलेल्या इमराना खानम काही कामानिमित्त भागलपूरला आल्या होत्या. येथे त्यांचे कजरैली सिमरिया येथे राहणारे मोहम्मद इबनुल हसन यांच्यावर प्रेम जडले. दोघांनी प्रेमविवाह केला. ते एकत्र राहू लागले. सुरुवातीला इमराना यांनी अनेक वेळा व्हिसाची मुदत वाढवली. पण नंतर दोघांनीही या प्रक्रियेकडे दुर्लक्ष केले. इमराना यांच्यावरची सरकारची नजरही राहीली नाही. नंतर काही वर्षांनी दोघे भागलपूरमधील इशाकचकच्या भीखनपूर भागात येऊन राहू लागले. तिथे त्यांनी घर बांधले.
पतीच्या ओळखीने पत्नीला मिळाली नोकरी
इबनुल बांका जिल्ह्यातील एका मदरशामध्ये नोकरी करत होते. त्यांनी आपली ओळख वापरून भागलपूरमधीलच बरहपुरा येथील उर्दू विद्यालयात इमराना खानम यांचीही शिक्षिका म्हणून नोकरी लावली. इमराना खानम यांनी येथे 'इमराना खातून' नावाने शिक्षिका म्हणून काम सुरू केले. इमराना यांनी व्हिसाची मुदत वाढवण्यासाठी अर्ज करणे बंद केल्यामुळे, गृह मंत्रालयाचे लक्ष या प्रकरणाकडे गेले. तीन वर्षांपूर्वी तत्कालीन वरिष्ठ पोलीस अधीक्षक बाबू राम यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली. त्यांनी परदेशी शाखा प्रभारी आणि काही पोलीस अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला. तेव्हा हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. उर्दू विद्यालय, बरहपुरा येथे शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या इमराना शाळेत हजर झाल्या नाहीत. पण शिक्षकांच्या नावाच्या फलकावर त्यांचे नाव नोंदवलेले होते. सध्या पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी अधिक जलद केली आहे. इमराना यांचे पती इबनुल यांचे 2018 मध्ये निधन झाले असून, त्यांना कोणतीही मुले नाहीत.
नक्की वाचा - MNS News: मनसेला जबर हादरा! बड्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी; राज ठाकरेंचा आदेश
इतर पाकिस्तानी नागरिकांनाही शोध
भागलपूरमधील भीखनपूर टँक लेनमध्ये राहणाऱ्या आणखी एका पाकिस्तानी महिला फिरदौसिया खानम यांचा ही शोध लागत नाही. मोहम्मद तफ्जील अहमद यांची पाकिस्तानी पत्नी फिरदौसिया खानम 19 जानेवारी 1956 रोजी तीन महिन्यांच्या व्हिसावर भारतात आल्या होत्या, त्यानंतर त्या इथेच राहिल्या. एका स्थानिक पत्रकाराने सांगितले की, व्हिसाची मुदत न वाढवता भागलपूरमध्ये राहणाऱ्यांची तपासणी करताना त्या गायब झाल्या. त्यांनी सांगितले की, यांच्याशिवाय काही इतर पाकिस्तानी नागरिकही भागलपूरमध्ये येऊन स्थायिक झाले होते. ज्यांचा ठावठिकाणा मिळत नाही. 2002 मध्ये पाकिस्तानमधून मोहम्मद अमीनउद्दीन नावाचा व्यक्ती गोराडीह पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डहरपूर गावात आला होता. येथील एका महिलेसोबत लग्न करून तो इथेच राहिला. जेव्हा परदेशी शाखा चौकशी करत असे, तेव्हा तो भूमिगत होत असे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world