- एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी महानगरपालिका निवडणुकीत एकत्र लढण्याचा निर्धार केला आहे
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीपासून वेगळे होऊन स्वतंत्र निवडणूक रणनिती
- अजित पवारांचा रणनिती मुख्यत्वे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांवर केंद्रित आहे
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या महायुतीमधील (भाजप, शिंदे गट शिवसेना, अजित पवार गट राष्ट्रवादी) अंतर्गत संघर्षाची चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीत बहुतांश जागांवर एकत्र लढण्याची तयारी दर्शवली आहे. असं असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाने मात्र महायुतीला डावलून एक वेगळीच निवडणूक रणनीती आखल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळे वळण लागण्याची दाट शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र केंद्रस्थानी
हा संपूर्ण "पवार प्लॅन" प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्राभोवती केंद्रित आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर यांसारख्या जिल्ह्यांचा समावेश असलेला हा भाग पवार कुटुंबाचा सर्वात मोठा राजकीय बालेकिल्ला मानला जातो. सूत्रांच्या माहिती नुसार अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीपासून वेगळे होऊन एकट्याने लढण्याचा निर्णय घेतला आहे. एवढेच नाही, तर काही निवडक जागांवर ते थेट आपले काका शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार यांच्यासोबत थेट आघाडी करण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर हे वेगवेगळे गट असले तरी, स्थानिक पातळीवर पवार कुटुंबाचा प्रभाव कायम ठेवणे हा या मागचा उद्देश असल्याचं बोललं जात आहे.
एकत्र येण्यामागचे गणित
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वैयक्तिक संबंध आणि प्रभावाचे मोठे महत्त्व असते. दोन्ही पवार गट एकत्र आल्यास, त्यांचा साखर पट्टा आणि सहकार क्षेत्रातील मूळ (Core) मतदार विभागला जाणार नाही. महायुती किंवा महाविकास आघाडीच्या गुंतागुंतीच्या जागावाटपाच्या वादांपासून दूर राहून, हे दोन्ही गट स्थानिक समीकरणांवर आधारित मजबूत उमेदवार उभे करू शकतील. त्याचा फायदा दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना होवू शकतो अशी रणनीती दोन्ही पवारांची दिसते. त्याला दोन्ही बाजूने सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचं ही बोललं जात आहे.
शिंदे-भाजपची कोंडी
शिंदे गट आणि भाजपने नुकतेच मुंबई आणि ठाणे महानगरपालिका निवडणुकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 'महायुती'च्या झेंड्याखाली एकत्र लढवण्याचे निश्चित केले आहे. यासंबंधी गुंतागुंतीचे जागावाटप सोडवण्यासाठी लवकरच संयुक्त समिती स्थापन होणार आहे. मात्र, अजित पवारांची ही नवीन खेळी महायुतीच्या एकजुटीवर थेट प्रश्नचिन्ह निर्माण करते. जर अजित पवारांनी त्यांच्या सर्वात मजबूत गडामध्ये 'युती धर्म' पाळला नाही आणि ते आपल्या राजकीय विरोधक असलेल्या काकांसोबत गेले, तर पश्चिम महाराष्ट्रात भाजपला स्वबळावर आघाडी घेणे अत्यंत कठीण होईल. महाराष्ट्राच्या राजकारणात ही एक नवी, गुप्त राजकीय समीकरणे जन्माला येण्याची शक्यता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world