- शुभम बायस्कार, प्रतिनिधी
महाराष्ट्रात सध्या महिला सुरक्षेचा मुद्दा चांगलाच ऐरणीवर आला आहे. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील एका प्रथितयश शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली. महाराष्ट्रासह देशभर या घटनेचे पडसाद उमटले. ही घटना ताजी असतानाच पुढील काही दिवसांत पुणे, सातारा, अकोला यासारख्या काही भागांतही महिला अत्याचाराच्या घटना समोर आल्या.
या सर्व घटनांमुळे राज्यातील सत्ताधारी महायुती सरकार टीकेच्या केंद्रस्थानी असताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेत्याने एक वादग्रस्त विधान केलं आहे. अमरावती जिल्ह्यातील शिंदे गटाचे शिवसेना नेते नानकराम नेभनानी यांनी अमरावती जिल्ह्यातील महिलांना बंदूक वापरण्याचा परवाना द्यावा अशी मागणी उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
हे ही वाचा - 'महिलांवर अत्याचार अक्षम्य पाप, दोषींना कडक शिक्षा झालीच पाहीजे'
निमीत्त काय होतं?
बांगलादेशात शेख हसीना यांना पंतप्रधानपदावरुन पायउतार व्हावं लागल्यानंतर स्थानिक धर्मांध मुस्लिम व्यक्तींकडून हिंदू समाजावर हल्ले वाढले होते. बांगलादेशात अनेक ठिकाणी हिंदूंच्या प्रार्थनास्थळांनाही लक्ष्य करण्यात आलं. या घटनांविरोधात अमरावतीमध्ये सकल हिंदू समाजातर्फे मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यात हिंदूत्ववादी पक्ष व सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या.
काय म्हणाले नेभनानी?
बांगलादेशात हिंदू समाजासोबत जे काही घडत आहे ते आपण पाहत आहोत. नरेंद्र मोदी हे एक कर्मठ माणूस आहेत आणि याविरोधात ते काहीतरी कारवाई करतील असा आम्हाला विश्वास आहे. राज्यातही ज्या काही घटना घडल्या आहेत त्या अत्यंत दुर्दैवी आहेत. मुख्यमंत्री साहेब त्याची दखल घेत आहेत. यापुढे असे प्रकार होणार नाहीत याची काळजी घेतली जात आहे.
मी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीसांना विनंती करतो की त्यांनी महिलांना रिव्हॉल्वर वापरण्याची परवानगी द्यावी. विशेषकरुन त्यांनी जर ही परवानगी दिली तर अमरावतीत मी स्वतः महिलांना माझ्यातर्फे रिव्हॉल्वहर घेऊन देईन. महिलांनी स्वसंरक्षणासाठी आता रिव्हॉल्वर वापरावी. यात दोन-चार चांगली माणसं मेली तरी हरकत नाही पण वाईट लोकं आता वाचली नाही पाहिजेत. याची जबाबदारी मी घेऊन, कोर्ट-कचेरीचा खर्चही मी करायला तयार आहे.
भाजपच्या अनिल बोंडेंची वेगळीच मागणी -
नेभनानी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर साहजिकच अमरावतीत त्याच्या प्रतिक्रीया उमटायला सुरुवात झाली आहे. भाजपचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी सर्वांचं मला माहिती नाही पण मला पहिल्यांदा बंदूक द्या असं म्हटलं आहे.