Mahavikas Aaghadi Satyacha Morcha Mumbai : मतदार याद्यांमधील कथित 'घोळ' आणि मतचोरीच्या गंभीर आरोपांवरून महाविकास आघाडी (MVA) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) आज, ( शनिवार, 1 नोव्हेंबर) मुंबईत 'सत्याचा मोर्चा' (Satyacha Morcha Mumbai) काढला. यावेळी या सर्व पक्षांनी निवडणूक आयोगाविरोधात जोरदार 'एल्गार' पुकारला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार व बाळासाहेब थोरात या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा मोर्चा काढण्यात आला. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, याद्या स्वच्छ करण्याची मागणी यावेळी लावून धरण्यात आली.
राज ठाकरेंचा 'कागदपत्रांचा डोंगर' आणि थेट पुरावा
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी या सभेत आपल्या भाषणातून निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर थेट हल्ला चढवला. "दुबार मतदार आहेत, हे केवळ आम्हीच नाही, तर भाजपचे लोक आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील लोकही म्हणत आहेत. मग निवडणुका घेण्याची एवढी घाई का?" असा थेट सवाल राज ठाकरे यांनी विचारला.
त्यांनी यावेळी एक महत्त्वपूर्ण आणि नाट्यमय पुरावा सादर केला. "आज मी इकडे पुरावा घेऊन आलो आहे. दुबार मतदारांना घेऊन आलोय," असे सांगत, राज ठाकरे यांनी उपस्थितांमध्ये ठेवलेल्या 'दुबार मतदारांच्या याद्यांच्या कागदपत्रांचा डोंगर' दाखवला. हा कागदपत्रांचा ढिगारा म्हणजे 'दुबार मतदार' असल्याचा त्यांचा दावा होता, जो उद्धव ठाकरे आणि शरद पवार हेदेखील पाहत होते.
( नक्की वाचा : MNS MVA Morcha Live Updates: 'निवडणूक आयोगाची लोकं घरी आले होते', उद्धव ठाकरेंचा मोठा दावा )
'तिथेच फोडून काढा'
राज ठाकरे पुढे म्हणाले, "मतदार याद्या साफ करा. पारदर्शक याद्या केल्यावर यश-अपयश कोणाचं आहे, हे स्पष्ट होईल." त्यांनी यावेळी 'कल्याण-डोंबिवली-मुरबाड' येथील साडेचार मतदारांनी 'मलबार हिल' मतदारसंघातही मतदान केल्याचा ठोस उल्लेख केला आणि यादीचा पुरावा दाखवला. "सगळं लपून-छपून सुरू आहे. लाखो लोक मतदानासाठी वापरले गेले आहेत," असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
यावेळी राज ठाकरे यांनी लोकांना एक कृती करण्याची सूचना दिली. "जेव्हा कधी निवडणुका होतील, तेव्हा याद्यांवर काम करा. प्रत्येक चेहरा ओळखला पाहिजे. दुबार-तिबार तिथे आले, तर तिथेच फोडून काढा आणि मग पोलिसांच्या ताब्यात द्या," असे निर्देश त्यांनी दिले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world