महायुतीत आता नवा गडी नको अशी मागणी पुढे येत आहे. सध्या महायुतीत भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आहे. या शिवाय काही छोटेमोठे पक्ष ही महायुतीचा भाग आहेत. मात्र या तीन मोठ्या पक्षांमुळे इतर लहान पक्षांना काहीच संधी मिळत नाही. ना विधानसभेला जागा मिळाल्या ना लोकसभेत संधी मिळाली. मंत्रिमंडळात स्थान तर दुरची गोष्ट राहीली. याबाबत महायुतीतल्या मित्रपक्षांनी जाहीर नाराजी ही व्यक्त केली. आता तर राज ठाकरेंनी महायुतीत येऊच नये अशी भूमीका केंद्रीय मंत्र्याने घेतली आहे. त्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महायुतीत आम्हाला आताच काही मिळत नाही. राज ठाकरे महायुतीत आल्यानंतर आम्हाला अजून काही मिळणार नाही. त्यामुळे महायुतीत मनसेने येऊ नये असं आवाहन आरपीआयचे नेते तसेच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. मनसे महायुतीत येईल अशी चर्चा सध्या सुरु आहे. राज ठाकरे आमचे चांगले मित्र आहेत. मात्र राज ठाकरे यांनी महायुतीत येऊ नये. असा आवाहन रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांना केलं आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीने मला डावललं. मात्र मी महायुतीला डावललं नाही असा टोला ही यावेळी रामदास आठवले यांनी लगावला. पिंपरी चिंचवड शहरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांना ज्या प्रकारे आपल्या पक्षातील नेते आणि कार्यकर्ते सांभाळावे लागतात, अगदी त्या प्रकारे मला देखील माझे कार्यकर्ते सांभाळावे लागतात. त्यामुळे महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत आम्हाला जागा देण्यात याव्यात अशी मागणी आठवले यांनी केली आहे.
विधानसभा निवडणुकी पूर्वी लाडक्या बहिणींचे निकष हे शिथील होते. मात्र आता राज्य सरकारच्या तिजोरीत पैसे कमी असल्याने त्यांनी लाडक्या बहिणीचे निकष कडक केले आहेत. असा घरच्या आहेर देखील रामदास आठवले यांनी महायुती सरकारला दिला आहे. सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात कारवाई सातत्यानं होत आहे. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात अजूनही दोषींवर कोणती कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावं. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी ही मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.