Raj Thackeray Uddhav Thackeray Reunion: संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेला मेळावा शनिवारी (5 जुलै) मुंबईतल्या वरळीमध्ये होणार आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे याला विशेष महत्त्व आहे. वाजत गाजत या.... गुलाल उधळत या.... मराठीचा विजय साजरा करायला या...कुठलाही झेंडा नको मराठीसाठी या.... या शब्दात मेळाव्याचं आमंत्रण देण्यात आलं आहे. कोण येणार, कोण व्यवस्था पाहणार, कोण बोलणार सगळं ठरलंय. पण तरीही बऱ्याच प्रश्नांची उत्तरं अजून मिळायची आहेत आहेत. उद्धव आणि राज यांच्या मराठीच्या मेळाव्याबद्दल महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला पाच मुख्य प्रश्न पडले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
प्रश्न पहिला : मेळाव्यात पहिलं कोण बोलणार आणि शेवटचं कोण बोलणार?
राज ठाकरे या मेळाव्याचे आयोजक म्हणजे यजमान आहेत. त्यामुळे राज ठाकरेच शेवटी बोलतील अशी चर्चा आहे. मात्र राज ठाकरे आहेत 57 वर्षांचे आणि उद्धव ठाकरे 64 वर्षांचे आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंना ज्येष्ठतेचा मान देत राज ठाकरे उद्धवना शेवटी बोलू देणार का... याची उत्सुकता आहे
प्रश्न दुसरा: मेळाव्याबद्दलचा दुसरा प्रश्न महापालिका निवडणूक एकत्र लढवण्याची घोषणा दोघे भाऊ करणार का ?
या प्रश्नाचं उत्तर शोधायचं झालं तर घोडामैदान अजून दूर आहे. अजून प्रत्यक्षात दोन भाऊ एकत्र येण्याबद्दल एकमेकांशी बोललेलेच नाहीत, असं उद्धव ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. जी बोलणी सुरू आहेत, ती मध्यस्थांमार्फत सुरू आहेत. महापालिका निवडणूक लढवायची म्हणजे जागावाटपाची बोलणी व्हायला हवी, दोन्ही पक्षांच्या मेळाव्यासाठी एकत्र चर्चा झाल्या असल्या तरी महापालिका निवडणुकीबद्दलची चर्चा अजून दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये झालेल्या नाहीत. कुणाला किती जागा, कुणाच्या किती सभा, हे सगळं ठरवल्याशिवाय महापालिका निवडणुकीत एकत्र येण्याची घोषणा करणं दोन्ही भावांसाठी धाडसाचंच ठरेल.
आणखी महत्त्वाचं म्हणजे हा कुठल्या पक्षाचा मेळावा नाही, असं राज ठाकरेंनी जाहीर केलंय... त्यामुळे या मेळाव्यात राजकीय घोषणा होण्याची शक्यता कमी आहे.
(नक्की वाचा : Eknath Shinde : एकनाथ शिंदें म्हणाले 'जय गुजरात', अजित पवारांनी वाजवल्या टाळ्या! पाहा Video )
प्रश्न तिसरा : उद्धव ठाकरे मविआतून बाहेर पडण्याचे संकेत या मेळाव्यात देणार का ?
मुंबई महापालिका शिवसेनेनं स्वबळावर लढायला हवी, असं म्हणत संजय राऊतांनी सगळ्यात आधी स्वबळाची भाषा सुरू केली होती. मात्र मुस्लिम मतांचा ठाकरेंना चांगला पाठिंबा मिळाला, हेही ठाकरेंना लक्षात घ्यावं लागणार आहे. त्याचवेळी महापालिका निवडणुकांचं वारं वाहू लागलेलं असताना महाविकास आघाडीची एकही बैठक त्यादृष्टीनं झालेली नाही त्यामुळे मविआचं काय होणार, या प्रश्नाचं उत्तर उद्धव ठाकरे मेळाव्यात देतील, याबद्दल साशंकताच आहे.
प्रश्न चौथा : भाजप आणि एकनाथ शिंदेंची साथ राज ठाकरे सोडणार का ?
एकत्र येण्याचा प्रस्ताव ज्यावेळी राज ठाकरेंनी मुलाखतीत दिला, त्याला उद्धव ठाकरेंनी दोन तासांतच प्रतिसाद दिला होता मात्र त्याचवेळी महाराष्ट्राच्या शत्रूंशी भेटीगाठी बंद करा, अशी अटही उद्धव ठाकरेंनी घातली होती. उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरु झाल्यानंतरही दोन वेळा राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांची भेट झाली होती. अधूनमधून एकनाथ शिंदे आणि उदय सामंत शिवतीर्थावर खिचडी खाण्यासाठी जातच असतात. राज ठाकरेंची भूमिका कायम बदलती राहिलीय. त्यामुळे भाजप आणि शिंदेंची साथ सोडण्याबद्दल राज ठाकरे भाष्य करण्याची शक्यता कमीच आहे.
( नक्की वाचा : CM on Thackeray : 'उद्धव - राज ठाकरेंनी एकत्र यावं, आणि...' मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे सांगितलं )
प्रश्न पाचवा : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन मनसे शिवसेनेत विलीन होणार का?
ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते सध्या एकत्र आंदोलनं करत आहेत. एकत्र येऊन सत्यनारायणाच्या पूजा करतायत. ग्राऊंडवरती ठाकरेंची शिवसेना आणि मनसे भाई-भाई झालेत...मात्र अख्खा पक्ष घेऊन शिवसेनेत जायचं म्हटलं तर मनसेच्या स्थापनेचा उद्देशच धोक्यात येतो.आणि ज्या मुद्द्यावर राज ठाकरे शिवसेनेपासून वेगळे झाले, तो मुद्दा कायम उरतो. शिवसेनेत तू मोठा की मी मोठा, या प्रश्नावरुनच शिवसेनेची दोन शकलं झाली आणि राज ठाकरेंनी नवनिर्माणाचा झेंडा हाती घेतला होता. त्यामुळे पक्ष विलीन करण्याचा किंवा ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर जाण्याबद्दलचा निर्णय राज ठाकरे मेळाव्यात घेतील, असं सध्या तरी वाटत नाही.
थोडक्यात काय तर उद्धव आणि राज ठाकरेंच्या मेळाव्याला गर्दी नक्की होईल. राज आणि उद्धवना इतक्या वर्षांनी हसत खेळत एकत्र पाहण्यासाठी जे आसुसले आहेत, त्यांच्या डोळ्यांचं पारणं नक्की फिटेल. या मेळाव्यातून राजकीय प्रश्नांची उत्तरं मिळण्याची शक्यता कमी आहे.
मात्र या मेळाव्यात काय पाहायचंय ते लक्षात ठेवा....राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची मेळाव्यातली बॉडी लँग्वेज कशी आहे, रश्मी ठाकरे आणि शर्मिला ठाकरे एकमेकांशी किती बोलतात, तेजस, आदित्य आणि अमित यांच्यातली केमिस्ट्री काय सांगते... दोन भावांच्या एकत्र येण्याला प्रतिसाद काय मिळतो...
त्यावरच ठरेल की या मेळाव्यानं महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलेल की नाही ?