महाराष्ट्रामध्ये शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यात वाढत असलेल्या जवळीकीमुळे राज्याच्या प्रमुख विरोधी आघाडी 'महाविकास आघाडी'च्या अस्तित्वाबाबत चर्चा सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासोबत युती केली, तर ते महाविकास आघाडीमध्ये राहू शकतील का, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. राज ठाकरेंना सोबत घेणे काँग्रेससाठी मान्य नाही, असे सूत्रांनी सांगितले आहे.
गुरूवारी शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंसोबतच्या युतीचा निर्णय घेण्यासाठी आपण आणि राज सक्षम आहोत आणि या प्रकरणात कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपाची गरज नाही, असे स्पष्ट केले. उद्धव ठाकरे यांच्या या विधानामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि काँग्रेस हे महाविकास आघाडीचे (MVA) दोन प्रमुख घटक आहेत. उद्धव यांनी राज ठाकरेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला, तर महाविकास आघाडीमध्ये त्यांचे राहणे कठीण होईल.
राज ठाकरे यांच्या 'महाराष्ट्र नवनिर्माण सेने'ने (मनसे) अलीकडेच अमराठी भाषिकांबद्दल जे कठोर धोरण स्वीकारले आहे, ते काँग्रेसला रुचणारे नाही. गेल्या काही महिन्यांमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी मराठी न बोलणाऱ्या काही जणांना चोपलं होतं आणि आंदोलने केली होती. मनसेचा उत्तर भारतीयांविरोधात आक्रमक होण्याची ही पहिली वेळ नाहीये. महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असतानाही मनसेने अशा प्रकारची आंदोलने केली होती. मनसे महाविकास आघाडीमध्ये सामील झाल्यास काँग्रेसला उत्तर भारतीय आणि त्याखालोखाल अल्पसंख्यांक मते दुरावतील अशी भीती वाटते आहे. कारण मधल्या काळात राज ठाकरे यांनी कडवट हिंदुत्वाचीही भूमिका अंगीकारली होती.
( नक्की वाचा : Supriya Sule: उद्धव ठाकरे दिल्लीत आणि सुप्रिया सुळेंनी घेतली PM मोदींची भेट! कारण काय? )
दुसरीकडे, उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडतील, अशीही एक शक्यता आहे. महाविकास आघाडी 2019 मध्ये एकसंध शिवसेना, एकसंध राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेसला एकत्र करून बनली होती. जर उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडले, तर आघाडीच्या अस्तित्वच संकटात येईल. 2023 मध्ये झालेल्या फुटीनंतर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसची (एसपी) अवस्थाही नाजूक झाली आहे. अशात काका शरद पवार आणि पुतण्या अजित पवार पुन्हा एकत्र येऊ शकतात अशी चर्चा अधूनमधून ऐकू येते.
तिसरी शक्यता अशी आहे की, उद्धव आणि राज ठाकरे यांच्यात कोणतीही राजकीय युती होणार नाही. गेल्या 5 जुलै रोजी उद्धव आणि राज ठाकरे 20 वर्षांनंतर मुंबईच्या वरळी येथे पहिल्यांदाच एका सार्वजनिक मंचावर एकत्र दिसले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपण दोघे एकत्र आलो आहोत आणि पुढेही सोबत राहू, असे म्हटले होते, पण काही दिवसांनंतर राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले की, त्या दिवशीचे एकत्र येणे हे फक्त 'हिंदी विरोध' या मुद्द्यावरून होते. त्यामुळे सध्या दोघांमध्ये कोणत्याही राजकीय युतीचा निर्णय झाला आहे, असा अर्थ काढू नये. काही राजकीय विश्लेषकांना अशीही भीती वाटते की, निवडणुकांच्या ऐन तोंडावर जागावाटपावरून दोन्ही भावांमध्ये पुन्हा वाद होऊ शकतो आणि त्यांच्या पक्षांमध्ये युती होणार नाही. काहींच्या मते, भाजपनेच हा सगळा खेळ घडवून आणला आहे.
( नक्की वाचा : India Alliance News: इंडियाच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा अपमान? सहाव्या रांगेत स्थान दिल्याने चर्चांना उधाण )
महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील 3 महिन्यांच्या आत होणार आहेत. एका बाजूला महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र निवडणूक लढवण्याबाबत साशंक आहेत, तर दुसरीकडे सत्ताधारी महायुतीतील घटक पक्षांनी बहुतांश महानगरपालिकांमध्ये एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या राजकीय स्थितीमुळे या निवडणुका अंतिशय रंगतदार होणार यात बिलकुल शंका नाही.