बंडखोरांची ताठर भूमिका, काँग्रेस नेत्यांची सुनील केदार यांच्याविरोधात तक्रार; काँग्रेसची डोकेदुखी वाढली

केदार यांचे विदर्भात समर्थक मोठ्या प्रमाणावर आहेत. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला अपेक्षित असलेल्या जागा मिळाल्या नाहीत. या जागांवरून शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या दोन मित्र पक्षांशी काँग्रेसला झगडावं लागलं.

जाहिरात
Read Time: 3 mins
नागपूर:

माजी मंत्री आणि काँग्रेस नेते सुनील केदार (Sunil Kedar) यांना नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी (Nagpur District Bank Scam)  शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यांच्या दोषसिद्धीला स्थगिती देण्यास नकार दिल्याने सुनील केदार यांना यंदाची विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election 2024)  लढवता आली नाही. केदार यांचे विदर्भात समर्थक मोठ्या प्रमाणावर आहेत. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला अपेक्षित असलेल्या जागा मिळाल्या नाहीत. या जागांवरून शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या दोन मित्र पक्षांशी काँग्रेसला झगडावं लागलं. अखेर काँग्रेसलाच नमतं घ्यावं लागलं होतं, ज्यामुळे काँग्रेसचे नेतेही नाराज झाले होते. काँग्रेसच्या वाट्याला काही जागा न आल्यानं बंडखोरी झाली. यातील काही मतदारसंघात केदार यांच्या समर्थकांनी बंडखोरी केल्याचे दिसून आले. यावरून काँग्रेस उमेदवार आणि काँग्रेस नेते यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे केदार यांच्याविरोधात कारवाई करा असा सूर आळवण्यास सुरुवात केली आहे. 

नक्की वाचा : राज ठाकरे यांनी प्रचाराचा नारळ फोडला, उद्धव, पवारांसह एकनाथ शिंदेंवरही टीका

मुळक यांची माघार नाहीच 

नागपूर जिल्ह्यातील चार प्रमुख विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांसमोर बंडखोरांनी आव्हान उभे केले आहे. रामटेकमध्ये शिवसेना(उबाठा) पक्षाच्या विशाल बरबटे यांना उमेदवारी देण्यात आली. काँग्रेसने या मतदारसंघासाठी बरेच हातपाय मारले पण त्यांना हा मतदारसंघ मिळाला नाही. इथून माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 4 नोव्हेंबर ही अखेरची तारीख होती. मुळक यांनी आपला अर्ज मागे घेतलेला नाही मुळक हे सुनील केदार यांचे समर्थक मानले जातात. मुळक यांनी जेव्हा अर्ज दाखल केला तेव्हा सुनील केदार हे देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. याशिवाय रामटेकचे खासदार श्यामसुंदर बर्वे आणि रश्मी बर्वेही उपस्थित होते. 

Advertisement

नक्की वाचा : नाशकात निवडणुकीचं चित्र कसं असेल? कोणत्या महत्त्वाच्या बंडखोरांची माघार?

हिंगण्यात दिलासा, नागपूर पश्चिममध्ये आव्हान कायम

हिंगण्यात राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) पक्षाच्या रमेश बंग यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सुनील केदार यांच्या समर्थक उज्ज्वला बोढारे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता, मात्र त्यांची मनधरणी करण्यात काँग्रेस नेत्यांना यश आलं. नागपूर पश्चिममधून निवडणूक लढवणारे विकास ठाकरे मात्र तितके नशीबवान ठरले नाहीत कारण इथून नरेंद्र जिचकार यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेला अर्ज माघारी घेतला नाही.  

Advertisement

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सुनील केदार हे काँग्रेसचे विदर्भातील प्रभावशाली नेत्यांपैकी एक मानले जातात. त्यांच्या समर्थकांनी केलेली बंडखोरी आणि ती क्षमवण्यात पूर्णपणे यश न आल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार आणि काँग्रेसचे नेते काहीसे धास्तावले आहेत. भविष्यात आणखी त्रास वाढू नये यासाठी सुनील केदार यांच्यावर वेळीच कारवाई केली जावी अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी करण्यास सुरुवात केली आहे.   

Advertisement
Topics mentioned in this article