राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठं बहुमत मिळालं. त्यानंतर भाजपाचे देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले. फडणवीसांच्या नेतृत्त्वाखालील मंत्रिमंडळाचाही शपथविधी पार पडला आहे. त्याचबरोबर नवं सरकार सत्तेत आल्यानंतर पहिलं अधिवेशन नागपूरमध्ये सुरु आहे. या अधिवेशनात विधानपरिषदेच्या सभापतीपदासाठीची भाजपाचा उमेदवार निश्चित झाला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भाजपानं विधानपरिषदेच्या सभापतीपदासाठी राम शिंदे यांची निवड केली आहे. राम शिंदे हे आहिल्यानगर जिल्ह्यातल्या कर्जत-जामखेडचे आहेत. ते देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. 2019 साली रोहित पवार यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर त्यांना भाजपानं विधानपरिषदेवर संधी दिली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही रोहित पवार यांनी त्यांचा निसटता पराभव केला.
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारातही राम शिंदे यांचं नाव चर्चेत होतं. पण, त्यांचा समावेश झाला नाही. त्यानंतर त्यांना विधानपरिषदेचे सभापती केलं जाईल ही शक्यता व्यक्त करण्यात येत होती. ती शक्यता आता खरी ठरलीय. स्वत: राम शिंदे यांनी स्वत: याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे.
( नक्की वाचा : Dhananjay Munde : धनंजय मुंडेंना शेवटच्या क्षणी मंत्रिपद कसं मिळालं? कोणते फॅक्टर ठरले निर्णायक? )
महाराष्ट्र विधान परिषद सभापती निवडणूक " माझी उमेदवारी घोषित केल्याबद्दल देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब, राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ,उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब ,उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार साहेब ,त्याचबरोबर देशाचे गृहमंत्री श्री अमित भाई शहा साहेब, भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष श्री जे पी नड्डाजी ,भारतीय जनता पार्टीचे राज्याचे अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे व एनडीएचे आणि महायुतीचे आणि सर्व नेते यांचे मी मनापासून आभार मानतो . टिप :- उद्या सकाळी विधान भवन नागपूर येथे १० वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. धन्यवाद .' असं ट्विट शिंदे यांनी केलं आहे.
" महाराष्ट्र विधान परिषद सभापती निवडणूक "
— Ram Shinde आ प्रा राम शिंदे (@RamShindeMLA) December 17, 2024
माझी उमेदवारी घोषित केल्याबद्दल
देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब,
राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ,
उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब ,
उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार साहेब ,
त्याचबरोबर देशाचे…
रामराजे निंबाळकर यापूर्वी विधानपरिषदेचे सभापती होते. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर हे पद रिक्त होते. शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे या सध्या विधानपरिषदेच्या उपसभापती आहेत. नीलम गोऱ्हे यांना सभापती म्हणून बढती मिळणार का? याबाबतही चर्चा सुरु होती. पण, भाजपानं हे पद आपल्याकडंच ठेवलंय. भाजपा आमदार राहुल नार्वेकर सध्या विधानसभेचे अध्यक्ष आहेत. सलग दुसऱ्यांदा त्यांची या पदावर निवड करण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world