जाहिरात

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंना शेवटच्या क्षणी मंत्रिपद कसं मिळालं? कोणते फॅक्टर ठरले निर्णायक?

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी (15 डिसेंबर) झाला. त्यामध्ये सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या यादीत धनंजय मुंडे यांचा समावेश नव्हता. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात होतं.

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंना शेवटच्या क्षणी मंत्रिपद कसं मिळालं? कोणते फॅक्टर ठरले निर्णायक?
मुंबई:

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी (15 डिसेंबर) झाला. या मंत्रिमंडळात भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि त्यांचे चुलत बंधू तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेेते धनंजय मुंडे यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतला आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात बहीण -भावांचा समावेश होण्याची ही पहिलीच घटना असावी. संभाव्य मंत्र्यांची नावं रविवारी समोर आली. सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या यादीत धनंजय मुंडे यांचा समावेश नव्हता. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. पण, अखेरच्या क्षणी धनंजय मुंडे यांनी बाजी मारली. कोणत्या कारणांमुळे धनंजय मुंडे यांचं नाव मागं पडलं होतं तसंच त्यांनी कोणत्या कारणांमुळे पुनरागमन केलं हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

नाव मागं का पडलं होतं?

विधानसभा निवडणुकीनंतर बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आहे. हे हत्या प्रकरण सध्या संपूर्ण राज्यात गाजत आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर आरोप करण्यात येत आहेत. कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्यानं विरोधकांनी त्यांनाही लक्ष्य केलंय. 

या प्रकरणात न्याय मिळत नाही तोपर्यंत येथील आमदाराला मंत्री करु नका, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी अजित पवारांकडे केली होती. बीड जिल्ह्याचा बिहार होतोय का? असा प्रश्न या निमित्तानं विचारला जात होता. सुरेश धस, संदीप क्षीरसागर या बीड जिल्ह्यातील आमदारांनीही या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतलीय. संतोष देशमुख हत्या प्रकरण धनंजय मुंडे यांना भोवणार अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. त्यामुळेच धनंजय मुंडे यांचं नाव सुरुवातीला मागं पडलं होतं.

Dhananjay Munde : गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे ते पवारांचे विश्वासू, धनंजय मुंडेंचा संघर्षाचा प्रवास

( नक्की वाचा : Dhananjay Munde : गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे ते पवारांचे विश्वासू, धनंजय मुंडेंचा संघर्षाचा प्रवास )

शेवटच्या क्षणी मंत्रिपद कसं मिळालं?

धनंजय मुंडे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय आहेत. अजित पवारांच्या बंडात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. शरद पवारांनीही तो राग व्यक्त केला आहे. अडचणीच्या काळात आपल्याला साथ देणाऱ्या मुंडेंना नाकारणे अजित पवारांना जड गेले असावे. त्याचबरोबर धनंजय मुंडे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील चांगले संबंध आहेत. हा फॅक्टर देखील त्यांच्यासाठी अनुकुल ठरला.

धनंजय मुंडे हे मराठवाड्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा महत्त्वाचा चेहरा आहे. मराठवाड्यात पक्षाला वाढवण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. मुंडेंना मंत्रिपद नाकारलं असतं तर मराठवाड्यातील पक्ष कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा मेसेज गेला असता, हे अजित पवारांनी हेरलं असावं.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर केलेल्या आंदोलनात मुंडे बंधू-भगिनींना लक्ष्य केलं होतं. लोकसभा निवडणुतकीत जरांगे फॅक्टरमुळे पंकजा यांचा पराभव झाला. पण, त्या निवडणुकीतही धनंजय यांनी त्यांच्या बहिणाचा जोरदार प्रचार केला होता.

राष्ट्रवादीच्या इतिहासात पहिल्यांदाच वळसे पाटलांवर आली वेळ, अजित पवारांनी मंत्रिपद का नाकारलं?

( नक्की वाचा : राष्ट्रवादीच्या इतिहासात पहिल्यांदाच वळसे पाटलांवर आली वेळ, अजित पवारांनी मंत्रिपद का नाकारलं? )

विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा प्रभाव कमी करण्यासाठी महायुतीच्या बाजूनं ओबीसी व्होट बँक गोळा करण्यात मुंडे यांची भूमिका निर्णायक होती.  बीड जिल्ह्यातल सहा पैकी पाच जागा महायुतीला मिळाल्या. स्वत: धनंजय मुंडे देखील विक्रमी मतांनी विजयी झाले. 

पुढील काही महिन्यातच महापालिकांसह जिल्हा परिषद, नगर परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होणीार आहेत. या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून धनंजय मुंडे यांना मंत्री करण्याचा राष्ट्रवादीला फायदा होऊ शकतो. या सर्व कारणांचा विचार करुन धनंजय मुंडे यांचा शेवटच्या क्षणी राज्य मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com