जाहिरात

Ramdas Kadam: 'गृहराज्यमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी पोलिसांनीच षडयंत्र रचले', कदमांचा मोठा आरोप

राज्यमंत्री योगेश कदम यांनी वाशी येथील एका लेडीज बारवर केलेल्या कारवाईचा संदर्भ देत रामदास कदम यांनी काही पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.

Ramdas Kadam: 'गृहराज्यमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी पोलिसांनीच षडयंत्र रचले', कदमांचा मोठा आरोप
रत्नागिरी:

राकेश गुडेकर 

‘सावली बार' वरुन शिवसेना नेते रामदास कदम आणि त्याचा मुलगा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता रामदास कदम यांनी नवीन स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी माजी मंत्री अनिल परब यांच्यावर 'अर्धवट वकील' असे म्हणत गंभीर आरोप केले आहेत. सावली बारचा परवाना रद्द करण्याच्या मागणीवरून अनिल परब यांनी विधानसभेत दिशाभूल केल्याचेही कदम यांनी सांगितले. कदम यांनी पत्रकार परिषदेत 'सावली बार' संदर्भातील करारपत्र (agreement) सादर केले. 'सावली बार' हे हॉटेल शरद शेट्टी यांना चालवण्यासाठी दिले होते. ‘या कलमानुसार, हॉटेलात कोणताही बेकायदेशीर धंदा चालवला जाणार नाही, असे स्पष्ट म्हटले आहे. तसेच, जर काही गैरकृत्य घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी चालवणाऱ्या व्यक्तीची असेल, मालकाची नाही. असं ही या करारात म्हटलं असल्याचं त्यांनी सांगितलं. 

हॉटेलमध्ये काही आक्षेपार्ह गोष्टी आढळल्याने आम्ही तात्काळ त्याला बाहेर काढले. परवाने 13 तारखेलाच जमा केले होते. तरीही अनिल परब यांनी 18 तारखेला विधानमंडळात हा विषय उपस्थित करून जाणीवपूर्वक आमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला, असं कदम म्हणाले. 'तुम्ही राजीनामा मागणारे कोण?' असा प्रतिप्रश्न त्यांनी अनिल परब यांना केला आहे. ते म्हणाले, ‘या हॉटेलचा गृहराज्यमंत्र्यांशी काहीही संबंध नाही, त्यामुळे राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही स्वतः परवाने जमा केलेले असतानाही, दिशाभूल करणारे आरोप केले जात आहेत असंही ते म्हणाले.  आम्ही या आरोपांना कामकाजातून काढून टाकण्यासाठी सभापतींकडे अर्ज दिला आहे. उद्धव ठाकरे आणि अनिल परब केवळ योगेश कदम यांना टार्गेट करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. कावळ्याने कितीही कावकाव केली तरी आम्ही दखल घेत नाही, असे म्हणत त्यांनी आपल्या विरोधकांवर निशाणा साधला.

नक्की वाचा - Jalne News: भाजप आमदाराचा कार्यकर्ता निघाला चोर, त्याने कसली चोरी केली माहित आहे का?

यावेळी त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर ही टीका केली. जितेंद्र आव्हाड यांचा धर्माच्या बाबतीत खूप अभ्यास आहे, त्यांनी धर्मगुरूच व्हायला पाहिजे असं ही ते म्हणाले. शिवाय आपल्याच पक्षाचे मंत्री संजय शिरसाट यांना एक सल्लाही त्यांनी दिला. सरकार म्हणजे आपण, आपण म्हणजे सरकार. आपल्या बापाचं काय जातंय, असं कुणालाही म्हणता येणार नाही. सरकारचा प्रत्येक पैसा योग्य कामासाठीच वापरला पाहिजे,' असे सांगत त्यांनी शिरसाट यांनी वक्तव्य जपून करावेत असं सांगितलं. राज ठाकरे यांच्या मनसेने केलेल्या अवैध डान्स बार तोडफोडीचे रामदास कदम यांनी जोरदार समर्थन केलं आहे. ‘महाराष्ट्रात जिथे जिथे लेडीज बार असतील ते सर्व साफ करून टाका,' असे मी माझा मुलगा मंत्री योगेश कदम यांना सांगितल्याचेही त्यांनी सांगितले.

नक्की वाचा - Manoj Jarange Patil: जरांगे पाटील असलेल्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून थेट जमिनीवर आदळली

राज्यमंत्री योगेश कदम यांनी वाशी येथील एका लेडीज बारवर केलेल्या कारवाईचा संदर्भ देत रामदास कदम यांनी काही पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. काही पोलिसांनी योगेशला फोन करून ही कारवाई थांबवण्यास सांगितले होते. ती न थांबवल्यामुळेच ठरवून योगेशला बदनाम करण्यासाठी काही पोलिसांनी हे षडयंत्र रचले आहे,' असा आरोप त्यांनी केला. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपण बोललो असून, दोषी पोलिसांची चौकशी केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेच्या शेवटी रामदास कदम यांनी अनिल परब यांना थेट इशारा दिला. ‘मी सर्व पत्ते उघड करणार नाही. पण आमच्या अंगावर जे चालून आले, त्यांच्यावर मी नेहमीच कायदेशीर कारवाई केलेली आहे. भविष्यात जे आमच्या मुळावर येण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांनाही योग्य वेळी उत्तर मिळेल,' असे त्यांनी सांगितले.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com