Ravindra Chavan: राज्यात 2022 साली मोठा राजकीय भूकंप झाला होता. तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारमधील ज्येष्ठ मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केलं. त्यानंतर शिंदे भाजपाच्या पाठिंब्यानं मुख्यमंत्री झाले. शिंदे गटाच्या आमदारापेक्षा भाजपा आमदारांची संख्या जास्त होती. त्यामुळे भाजपाचा मुख्यमंत्री होईल असा सर्वांचा अंदाज होता. पण, देवेंद्र फडणवीस यांनीच पत्रकार परिषदेत गुगली टाकत एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली होती.
फडणवीस यांनी टाकलेला तो गुगली सर्वांनाच बुचकळ्याट टाकणारा होता. विशेषत: भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांना यामुळे धक्का बसला होता. भाजपाचे नूतन प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनाही हा मोठा धक्का होता. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानं वाईट वाटलं, अशी स्पष्ट कबुली चव्हाण यांनी 'NDTV मराठी'ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये दिली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शपथविधी कार्यक्रमालाही चव्हाण उपस्थित नव्हते. त्याची त्यावेळी चांगलीच चर्चा झाली होती. आता तब्बल तीन वर्षांनी चव्हाण यांनी त्या सर्व घटनेवर पहिल्यांदाच सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.
( नक्की वाचा : Ravindra Chavan : '.....तर उद्धव ठाकरेंनाही सोबत घेऊ' भाजपा प्रदेशाध्यक्षांचं मोठं वक्तव्य )
काय म्हणाले चव्हाण?
भाजपाचा मुख्यमंत्री न होता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले याचं मला फार वाईट वाटलं, सगळ्यांना माहिती आहे, असं चव्हाण यांनी या मुलाखतीमध्ये सांगितलं. ते पुढे म्हणाले की, 'मी घरी निघून गेलो. पण, शेवटी देवेंद्रजींनी मला सांगितलं. त्यानंतर साडेअकरा वाजता एकनाथ शिंदेंबरोबर पुन्हा गोव्याला गेलो. एकनाथ शिंदे यांनी विमानात बसताना, रवी तुला वाईट वाटलं का? असं विचारलं त्यावेळी मी हो म्हणालो. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री न झाल्याचं महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना वाईट वाटलं. त्यामध्ये मी सुद्धा आहे, असं शिंदे यांना सांगितलं. मी हे लपवून ठेवलं नाही.
शिंदेंचा त्यामुळे रोष तुमच्यावर आला का? हा प्रश्न विचारल्यावर ''असं कसं होऊ शकतं?'', असं उत्तर चव्हाण यांनी दिलं. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातही मी मंत्री म्हणून काम करत होतो. त्यामुळे असं होत नाही. आपल्याला जे मनात वाटतं ते आपण बोलून दाखवणं यात काही चूक नाही. चेहऱ्यावरती दिसतंय आणि मनात ठेवणं हे काही योग्य नाही. मी निघून गेलो होतो, हे सर्वांना माहिती आहे. मी परत साडेअकरा वाजता त्यांच्यासोबत होतो, असं चव्हाण म्हणाले.