सार्वजनिक जीवनात बडेजाव टाकून साधेपणा ठेवा. जनतेत राहून जनतेची कामे करा. असा कानमंत्र राष्ट्रीय स्वयंम सेवक संघाकडून महाराष्ट्र सरकारमधील भाजपच्या नवनियुक्त मंत्र्यांना देण्यात आला आहे. त्याबाबतची माहिती आता समोर आली आहे. मुंबई येथे संघ आणि भाजपचे महाराष्ट्रातील मंत्री यांच्यात दोन दिवसीय बैठक सुरू आहे. या बैठकी दरम्यान वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा केली जात आहे. संघाकडून मंत्र्यांना काही सल्ले दिले जात आहे. शिवाय सार्वजनिक जिवनात वावरताना काय काय केलं पाहीजे याबाबत मार्गदर्शनही केले जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
मुंबईच्या परळ भागातील यशवंत भवनात शनिवारी आणि रविवारी हे बौद्धीक दिलं जात आहे. महाराष्ट्र सरकार मधील भाजपच्या नवनियुक्त मंत्र्यांचा संघ पदाधिकाऱ्यांशी परिचय आणि विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन असे समन्वय बैठकीचे सूत्र होते, असं भाजपचे प्रदेश प्रवक्ते चंदन गोस्वामी यांनी सांगितलं. सर्व घटक संस्था आणि भाजप एकच आहेत. परिवाराचा घटक आहे. त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी जी संस्था त्यांच्या पासून मार्गदर्शन घेत राहतात. विचार आदान प्रदान केले जाता. कुठे कमी कुठे जास्त आहोत याचाही विचार केला जातो. समाजात कोणत्या क्षेत्रात काम करायचे आहे याबाबतही मार्गदर्शन केलं जातं असं ते म्हणाले.
या समन्वय बैठकीत भाजप मंत्र्यांसमोर राज्यापुढील विविध मुद्दे देखील चर्चेीले गेले. महत्वाचे म्हणजे साधी राहणी हवी, बडेजावपणा किंवा अनावश्यक प्रदर्शन नको, जनतेत राहून कामे करण्याविषयी अपेक्षा संघ पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आल्या. मंत्री म्हटल्यावर त्याचा लवाजमा, रुबाब, आपण कोणी तरी महान आहोत असा आविर्भाव लोकांना आवडत नाही. याबाबतही संघाकडून या मंत्र्यांना सावध करण्यात आल्याचं सुत्रांकडून समजत आहे. मंत्र्यांनी जनतेशी नाळ तोडू नये. त्यांच्या बरोबर सतत संपर्कात राहावे असा ही सल्ला दिल्याचे समजत आहे. कार्यकर्ते आणि संघ यांच्यातही योग्य समन्वय असला पाहीजे असंही यात सांगण्यात आलं.
मंत्र्यांना याबाबत मार्गदर्शन केलं गेलं असेल तर ही चांगली गोष्ट आहेय. त्याचं स्वागत करायला पाहिजे. अशी प्रतिक्रीया संघ विचारक विराग पाचपोर यांनी दिली आहे. सार्वजनिक जीवनात जे लोक कामं करतात, त्या लोकांनी अनेक प्रकारची प्रलोभने टाळून जनतेच्या सेवेसाठी स्वतःला झोकून दिलेले असते. त्यामुळे, त्यांच्या जीवनात जनतेच्या कामाची प्राधान्यता असावी. स्वतःचा बडेजावपणा असू नये, ही एकदम सामान्य अपेक्षा आहे असंही ते म्हणाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एकूण तत्वज्ञानामधे साधेपणाला खूप महत्त्व आहे.डॉ. हेडगेवार यांच्या काळापासून आज पर्यंत संघाचे सर्व कार्यक्रम, सर्व कार्यशाळा, सर्व शिबिर अत्यंत साधेपणाने होतात. त्यामुळे साधेपणा हा जीवनात बाळगता येणे हे सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्यांसाठी आवश्यक आहे. त्यामुळे, अशी जर अपेक्षा व्यक्त केली असेल तर ती स्वागत योग्य आहे असे म्हणायला पाहिजे असंही त्यांनी सांगितलं. एकूणच नव्या सरकारने आपल्या शंभर दिवसांचा अजेंडा तयार केला आहे. तरी आता थेट संघाकडून कानमंत्र देण्यात येऊन त्या सोबत अपेक्षांची यादी प्रत्यक्ष मंत्र्यांना सोपविण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world