- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अँड. माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवली आहे
- अँड. कोकाटे यांनी शिक्षा नंतर पक्षाध्यक्ष अजित पवार यांच्याकडे राजीनामा दिला आहे
- आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत
संजय तिवारी
बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका लाटल्याच्या प्रकरणात राज्याचे क्रीडामंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते अँड. माणिकराव कोकाटे यांची दोन वर्षाची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवली. त्यानंतर दिवसभराच्या राजकीय घडामोडीनंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला. तो राजीनामा त्यांनी पक्षाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिला आहे. एक राजीनामा झाल्यानंतर आता दुसरा राजीनामा होण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एका महिला वकीलाने भाजपचे आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे उईके यांच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे.
राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके यांच्यावर एका स्थानिक वकील आणि सामाजिक कार्यकर्त्याने गंभीप आरोप केले आहे, आदिवासीची जमीन हडपणे, कंत्राटी कर्मचारी नेमणे, मुलींच्या आश्रमशाळा असुरक्षित करणे याबाबत उईके यांच्यावर गंभीर आरोप आहेत. हे प्रकरणी बाहेर काढणाऱ्या अधीक्षक महिलेला स्थानांतर करून नंतर निलंबित करण्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. ऐवढेच नाही तर त्यांनी त्यांच्या मुलीला मुंबई उच्च न्यायालयात ब वर्ग समुपदेशक पदी नियुक्ती मिळवून दिली आहे. शिवाय त्या यापदावर असताना त्या नगराध्यक्षपदाची निवडणूक कशा लढवत आहेत. या आणि अशा अन्य आरोपांची राळ उईके यांच्या विरोधात उठवण्यात आली आहे.
एका गरीब आदिवासीची पन्नास वर्षांपासून तो कसत असलेली जमीन पूर्वीच्या मालकांच्या वारसदारांना सोबत घेऊन हडप केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. शिवाय त्याला कोणतीही सूचना न देता त्याच्या उभ्या पिकात ट्रॅक्टर घालून जमीन सपाट करण्यात आली. यामागे उईके असल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी वारंवार तक्रार करून सुद्धा FIR घेतला गेला नाही असा ही आरोप करण्यात आला आहे. शिवाय राळेगाव तालुक्यात आदिवासी समाजाची पहिली सूतगिरणी स्थापन करण्याच्या नावाखाली गरीब आदिवासीचा छळ सुरू आहे. असा आरोप वकील सीमा तेलंगे लोखंडे यांनी केला आहे.
आदिवासी विकास मंत्री झाल्यानंतर अशोक वुईके यांनी एका खाजगी कंपनीच्या सहाय्याने कंत्राटी कर्मचारी नेमण्याचा सपाटा लावला. जिल्ह्यातील आदिवासींच्या आश्रमशाळांमध्ये मुली सुरक्षित नाहीत. इथल्या मुलींचे या कंत्राटी कर्मचाऱ्यांद्वारे लैंगिक शोषण झाले असल्याचा गंभीर आरोप ही तेलंगे यांनी केला आहे. याचे काही व्हिडीओ असल्याचा दावा ही त्यांनी केला आहे. या प्रकरणात महिला अधीक्षकांनी आवाज उचलला होता. मात्र त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचं त्या म्हणाल्या.या नंतर अनेक मुलींनी आश्रम शाळा सोडल्याचं ही त्या म्हणाल्या. मात्र “तेलंगे यांचा बोलविता धनी माजी मंत्री आहे,'सूत गिरणीच्या जमिनीचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे त्यावर बोलता येणार नाही. शिवाय तेलंगे यांच्या आरोपांवर मी उत्तर द्यावे इतक्या त्या मोठ्या नाहीत असं उईके यांनी सांगितलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world