Sanjay Raut on Shrikant Shinde foundation : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्या फाऊंडेशनला कोट्यावधी रुपये दिले ते दानशूर कोण आहेत? याची माहिती नागरिकांना मिळणे गरजेचे आहे, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली. संजय राऊत यांनी सोमवारी (15 एप्रिल) रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांना लक्ष्य केलं. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करावी अशी मागणी करणारं पत्र त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं आहे.
पत्रात काय आहे?
'देशातील भ्रष्टाचार, काळ्या पैशांचे व्यवहार मोडून काढण्यासाठी आपण गेल्या 10 वर्षांपासून अथक परिश्रम करीत आहात. 2024 च्या लोकसभा निवडणुकीतही आपण जनतेला पुन्हा एकदा तेच आश्वासन दिले. त्यानिमित्त महाराष्ट्रातील काळा पैसा पांढरा करण्याचे व गुन्हेगारी स्वरूपाचा पैसा समाजकार्याच्या नावाखाली ‘पांढरा' करण्याचा एक धंदा मी आपल्या निदर्शनास आणत आहे.
श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या सामाजिक कार्याचा सध्या राजकीय गाजावाजा सुरू आहे. सदर फाऊंडेशनच्या आर्थिक व्यवहारांची सार्वजनिक धर्मादाय न्यासाने सखोल चौकशी करावी अशी तक्रार प्रसिद्ध वकील नितीन सातपुते यांनी ठाणे धर्मादाय आयुक्तांकडे केली आहे, पण या तक्रारीस एक महिना उलटून गेला तरी ठाणे धर्मादाय आयुक्तांकडून तक्रारीची साधी दखल घेतली गेली नाही. धर्मादाय आयुक्तांवर राजकीय दबाव असल्यामुळेच ते माहितीच्या अधिकारातही याबाबतची माहिती द्यायला तयार नाहीत असे दिसते.
महाराष्ट्राला सामाजिक कार्याची मोठी परंपरा आहे. अनेक समाजसेवकांनी प्रसंगी पदरमोड करून संस्थात्मक कार्य केले आहे. त्यामुळे श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक कार्य होत असेल तर त्यास आक्षेप असण्याचे कारण नाही. या फाऊंडेशनतर्फे अनेक शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक उपक्रम घेतले जातात व ते अत्यंत भव्य स्वरूपात होतात. ते कार्य कौतुकास्पद आहेच, पण या भव्य उपक्रमावर आतापर्यंत खर्च झालेल्या कोट्यवधी रुपयांचे स्रोत काय? या कार्यासाठी ज्यांनी कोट्यवधी रुपये दिले ते दानशूर कोण? याची माहिती नागरिकांना मिळणे गरजेचे आहे.
तुमचा दुधाने अभिषेक करायचा आहे! उद्धव ठाकरेंना मनसैनिकाचे पत्र
मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कक्ष
श्रीकांत शिंदे फाऊंडेशनवर मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील किती सदस्य आहेत? फाऊंडेशनचे आत्तापर्यंतचे सर्व हिशेब धर्मदाय आयुक्तांकडे सुपूर्द केले आहेत काय? याबाबत गोपनियता बाळगली जात आहे. या फाऊंडेशनसाठी मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कक्ष उघडला गेला आहे व त्या माध्यमातून बिल्डर, ठेकेदारांकडून रोखीत रकमा घेतल्या जातात. आत्तापर्यंत किमान 500 कोटी रुपये या माध्यमातून जमा केले आहेत,' असा आरोप संजय राऊत यांनी या पत्रात केला आहे.