महाविकास आघाडीने जागा वाटपात आघाडी घेतल्याचे सध्या चित्र दिसत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जागा वाटपाबाबत मोठी बातमी दिली आहे. त्यांनी मुंबईतल्या 36 विधानसभा जागांबाबत महाविकास आघाडीत सहमती झाल्याचे सांगितले आहे. जवळपास 99 टक्के जागांवर एकमत झाल्याचे त्यांनी सांगितले. काही जागांवर अजून चर्चा सुरू असून त्यावर नक्की तोडगा निघेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र जागा वाटपात मुंबईत शिवसेनेचेच वर्चस्व असेल हे संकेत त्यांनी दिले आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुंबईत मविआची जागा वाटपात सहमती
मुंबईत विधानसभेच्या 36 जागा आहेत. या जागांबाबत मविआची नुकतीच मुंबईत बैठक झाली. या बैठकीत जवळपास 99 टक्के जागांवर सहमती झाल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. जे जागा वाटप झाले आहे ते अत्यंत काळजीपूर्क केले असल्याचे राऊत यांनी सांगितले. मुंबईवर मराठी माणसाचे आणि शिवसेनेचे वर्चस्व राहीले आहे. ते कायम रहावे या दृष्टीने जागा वाटप झाल्याचे सांगत मुंबईत शिवसेनाच मोठा भाऊ असेल याचे संकेत राऊत यांनी यावेळी दिले आहेत. मुंबई तोडण्याचे कारस्थान सुरू आहे. त्याला शह देण्यासाठी हे जागा वाटप झाल्याचे ते म्हणाले. मुंबईत मविआ म्हणूनच आम्ही सामोरे जाणार आहेत. त्यामुळे कोणाच्या पोटात दुखत असेल तर त्यांना औषध घ्यावे असा सल्ला राऊत यांनी दिला आहे.
ट्रेंडिंग बातमी - रविवारी उपनगरीय रेल्वेच्या तीनही मार्गांवर मेगाब्लॉक, कोणत्या लोकल झाल्या रद्द?
कोणाच्या वाट्याला किती जागा?
यावेळी बोलताना संजय राऊत यांनी महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्ट केले. जागा वाटपावरून वाद नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री कोण असावा यावरही वाद नसल्याचे त्यांना जाहीर केले. सर्व काही ठिक होईल. महाविकास आघाडी सरकार बनवेल हे निश्चित आहे असे त्यांनी सांगितले. मुंबईच्या जागा वाटपाबाबत निर्णय झाला आहे. आता उर्वरीत महाराष्ट्राबाबत निर्णय होईल असे राऊत यांनी स्पष्ट केले. 27 तारखेला याबाबत बैठक होणार आहे. त्यात समतोल पद्धतीने जागा वाटप होईल. हे बंद दाराआड होईल. बाहेर कोणीही काही बोलणार नाही किंवा सांगणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केसे. दरम्यान मुंबईतल्या 17 ते 18 जागा काँग्रेसला मिळाव्यात हा काँग्रेसचा दावा होता. त्यावर काही ठिकाणी शिवसेनेनं सहमती दर्शवल्याचे समजत आहे. तर काही जागांची आदलाबदली केली जाणार आहे. मुंबईत शिवसेना ठाकरे गट मविआत जास्त जागा लढेल हे स्पष्ट आहे.
ट्रेंडिंग बातमी - लखपती दीदींसाठी मोदी आज जळगावात, एकनाथ खडसेंच्या प्रवेशाबाबत अखेर पूर्णविराम!
'मोडतोड तांबा पितळ हे त्यांचे गठबंधन'
महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण याची चर्चा महायुतीने करू नये. त्यांची युती म्हणजे मोडतोड तांबा पितळ आहे. त्यांनी त्यांची काळजी करावी. ते दहीहंडी फोडता फोडता त्यांचे थर कोसळणार आहेत. जे वर लटकणार आहेत ते खाली पडणार आहेत असा टोलाही राऊत यांनी यावेळी लगावला. महिलांच्या सुरक्षेसाठी सध्या महाराष्ट्रात आंदोलन सुरू आहे. त्यावर पंतप्रधान काही जळगावमध्ये बोलणार आहेत का? असा प्रश्न राऊत यांनी यावेळी केला. ज्या जळगावमध्ये ते येत आहेत तिथे चार अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाले आहेत. असं असताना कोणाला लखपती बनवायला निघालात असा सवाल त्यांनी करत मोदींच्या दौऱ्यावर टिका केली.
राज ठाकरे नक्की कोणा सोबत?
मनसे प्रमुख राज ठाकरे हे सध्या नक्की कोणा सोबत आहेत अशी विचारणा संजय राऊत यांनी केली. ते नेहमी आपली भूमिका बदलत असतात. त्यांची एक अशी भूमिका नाही. त्यामुळे त्यांना गांभिर्याने घेण्याची गरज नाही असे राऊत म्हणाले. ते नेहमी महाराष्ट्राचा द्वेश करणाऱ्या मोदी आणि शहांना साथ देतात. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही असेही राऊत म्हणाले. सरकारकडे सध्या पैसे नाहीत. पण सुपाऱ्या देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे आहेत असा टोलाही त्यांनी लगावला. मविआला हरवण्यासाठी, पक्ष फोडण्यासाठी, कार्यकर्ते फोडण्यासाठी सरकार भरपूर पैसे खर्च करत असल्याचे यावेळी राऊत म्हणाले.