विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच प्रचाराच्या रणधुमाळीनं वेग घेतला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावर चर्चा सुरु आहे. त्याचवेळी वंचित बहुजन आघाडीनं उमेदवारांची घोषणा करत आघाडी घेतली आहे. या आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी (18 ऑक्टोबर) मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांवर गंभीर आरोप केला. शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी एका दौऱ्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची भेट घेतल्याचा आरोप आंबेडकरांनी केला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे आरोप?
प्रकाश आंबेडकर यांनी या विषयावर आरोप करताना दावा केला की, '1988 ते 91 या कालावधीमध्ये शरद पवारा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांचा एक दौरा लंडनला होता. तिथून ते कॅलिफोर्नियाला गेले. तिथे ते दोन दिवस राहिले. त्यांची मीटिंग कोणासोबत झाली. त्याचा खुलासा त्यांनी केला पाहिजे. कॅलिफोर्नियामधून शरद पवार लंडनला पुन्हा आले. दोन दिवस लंडनमध्ये थांबले. तिथून दुबईला गेले. त्यांची दुबईमध्ये विमानतळावर दाऊद इब्राहिमची भेट झाली. त्यांना तिथे सोन्याचा हार घालण्यात आला.'
शरद पवार त्या काळात मुख्यमंत्री होते. त्यामुळे त्यांना केंद्र सरकारची परवानगी असल्याशिवाय दौऱ्यावर जाता येत नाही. तेव्हा केंद्र सरकारने त्यांना कॅलिफोर्नियाच्या बैठकीत उपस्थित राहण्याची परवानगी दिली होती का ? शरद पवार यांना केंद्र सरकारने त्या वेळी परवानगी दिली असेल, तर मग दुबईत जाऊन दाऊद इब्राहिमला भेटण्याची परवानगी पण दिली होती का? आणि त्या बैठकांचा अहवाल केंद्र सरकारला दिला होता का? असे प्रश्न आंबेडकर यांनी विचारले.
( नक्की वाचा : महाविकास आघाडी पक्षाला आणखी एक धक्का, 'हा' पक्ष साथ सोडण्याच्या तयारीत )
आताच आरोप का?
प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या आरोपाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिलं आहे. शरद पवार मुख्यमंत्री होते त्यावेळी हा गौप्यस्फोट झाला नाही. 1991 नंतर इतक्या वर्षांनी हा गौप्यस्फोट का होतोय असा सवाल त्यांनी विचारला आहे.