अमजद खान
गृहाराज्य मंत्री योगश कदम यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. त्यांच्या बारचा मुद्दा विधान परिषदेत उपस्थित करत शिवसेना आमदार अनिल परब यांनी कदम यांची कोंडी केली होती. शिवाय त्यांच्या राजीनाम्याची मागणी ही केली होती. त्यांच्या बचावासाठी त्यांचे वडील रामदास कदम ही मैदानात उतले होते. त्यांनी ही या प्रकरणी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. आता थेट योगेश कदमच ठाकरेंना भिडताना दिसत आहेत. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत प्रत्युत्तर दिलं आहे.
उद्धवजी काँग्रेस नेत्या सोनिया गांधींना भेटण्यासाठी दिल्लीला जातात. महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात मुख्यमंत्री होण्यासाठी काँग्रेसचे तळवे चाटतात. वंदनीय बाळासाहेब असते, तर असं काही झालं असतं का? अशा शब्दांत राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. योगेश कदम हे कल्याणजवळील बल्याणी येथे शिवसेना नेते मयूर पाटील यांच्या वतीने आयोजित विद्यार्थी सन्मान कार्यक्रमात उपस्थित होते.
नक्की वाचा - Viral video:' मराठी येत नाही तर बाहेर निघ', लोकलमध्ये महिलांच्या डब्यात जोरदार राडा
कल्याणच्या बल्याणी येथे 500 विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा सन्मान गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी स्पष्ट आणि थेट उत्तरं दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली भेटीवर उद्धव ठाकरे यांनी ‘शिंदे चोरीने भेटतात' अशा प्रकारचा टोला लगावला होता. त्याबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात योगेश कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री होण्यासाठी काँग्रेसचे तळवे चाटले, तेव्हा काय होतं? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
तसेच आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची एका हॉटेलमध्ये झालेली भेट यावर प्रतिक्रिया देताना कदम म्हणाले, राज्यात काही लोक असा अपप्रचार करत आहेत की शिवसेना आणि भाजपामध्ये काही बिनसले आहे. मात्र, शिवसेना आणि भाजपामध्ये उत्तम समन्वय आहे.कृषीमंत्र्यांचा रमी खेळताना व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना कदम म्हणाले, “मी तो व्हिडिओ पाहिलेला नाही.” तसंच उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीबाबत ते म्हणाले, “उद्धव ठाकरे यांची मुलाखत कोणीच पाहत नाही. स्वतःच्याच नेत्यांकडून मुलाखत घ्यायची आणि स्वतःच उत्तरं द्यायची, अशी मुलाखत आम्ही जगात पहिल्यांदाच पाहतो आहोत. त्यामुळे अशा मुलाखतींना आम्ही काही महत्त्व देत नाही.” असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.