महाविकास आघाडी आणि महायुतीत कोणता मतदार संघ कोणाच्या वाट्याला जाईल हे अजूनही निश्चित नाही. त्यामुळे इच्छुकांचीही चलबीचल सुरू आहे. जागा वाटपानंतर कोणता नेता कोणत्या पक्षात जाईल हे आताच कोणीही सांगू शकत नाही अशीच सद्याची स्थिती आहे. त्यामुळे इच्छुकही शक्यता तपासून पाहात आहेत. त्यानुसार तेही पावले टाकत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची शिव स्वराज्य यात्रा जुन्नरमधून सुरू झाली. यावेळी जुन्नरचे माजी आमदार आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते शरद सोनवणे यांनी याच वेळी जयंत पाटील यांची भेट घेतली. ऐवढेच नाही तर सहभोजनालाही उपस्थिती लावली. त्यामुळे सर्वांच्याच भूवया उचावल्या आहेत. त्यामागे कारणही तसेच आहे.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जुन्नर विधानसभा मतदार संघात सध्या अतुल बेनके हे आमदार आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात आहेत. विद्यमान आमदार आहे त्या पक्षाला ती जागा असे सुत्र ठरले आहे. त्यामुळे ही जागा महायुतीत अजित पवारांच्या पारड्यात जाणार हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार शरद सोनवणे हे अस्वस्थ आहेत. शरद सोनवणे हे या आधी जुन्नरचे आमदार राहीले आहेत. त्यांनी मनसेकडून त्यावेळी निवडणूक लढली आणि जिंकली. त्यानंतर ते शिवसेनेत गेले. पक्षात पडलेल्या फुटीनंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिली. या मतदार संघातून निवडणूक लढण्यास ते इच्छुक आहेत. पण ही जागाच जर शिवसेना शिंदे गटाला सुटली नाही तर सोनावणे यांची कोंडी होणार आहे.
ट्रेंडिंग बातमी - विधानसभा निवडणुका कधी होणार? पाटलांनी तारखेसह महिनाही सांगितला
अशा स्थितीत सोनवणी यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी बरोबर घरोबा करण्याचा प्रयत्न सुरू केल्याची चर्चा सुरू आहे. त्याला निमित्त होतं राष्ट्रवादीच्या शिव संकल्प यात्रेचे. या यात्रे निमित्त जयंत पाटील हे जुन्नरमध्ये होते. त्याच वेळी सोनवणेंनी जयंत पाटील यांची भेट घेतली. शिवाय त्यांच्या सोबत थेट जेवणाचा आस्वाद घेतला. शिव स्वराज्य यात्रेदरम्यान जुन्नरमधील जय हिंद महाविद्यालयात जेवणासाठी ते थांबले होते. त्यावेळी सोनवणेंनी हजेरी लावल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
मात्र जयंत पाटील आणि माझे प्रेमाचे नाते आहे. त्यात जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमस्थळी आम्ही एकत्र आलो, त्यांनी मला बोलावलं म्हणून मी जेवायला आलो असं सोनवणे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आमच्या भेटीमागे राजकीय अर्थ काढू नये असं सोनवणे म्हणालेत. गेल्याचं महिन्यात अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांनी ही थेट शरद पवारांची भेट घेतली होती. त्यामुळे महायुतीकडून इच्छुक असणाऱ्या उमेदवारांचे नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न मतदार संघात विचारला जातोय. मात्र सोनवणे यांनी या भेटी मागे कोणताही राजकीय अर्थ काढू नये असं जरी सांगितलं असेल तरी शरद पवारांनी आपले फासे टाकले आहेत अशीही चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे अजित पवारांच्या गडात शिंदेंचा मोहरा गळाला लावून शरद पवारांनी महायुतीवरच कुरघोडी करण्याचा प्रयत्न केल्याचंही बोललं जात आहे.