ठरलं तर मग! जागांसाठी शिवसेना आक्रमक, मित्रपक्षांचे टेन्शन वाढले

'वर्षा' या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक बोलावण्यात आली होती .

Advertisement
Read Time: 3 mins
मुंबई:

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये शिवसेनेची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला शिवसेनेचे सगळे प्रमुख नेते उपस्थित होते.  'वर्षा' या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक बोलावण्यात आली होती . एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सुरू असलेल्या घडामोडींमुळे महायुतीतील मित्र पक्षांचे टेन्शन वाढत चालले आहे. 

लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित असे यश मिळाले नव्हते. मात्र या निवडणुकीत आपल्या पदरात जास्त जागा पाडून घेण्यात आणि मिळालेल्या जागांपैकी अधिकाधिक जागा जिंकून आणण्यात एकनाथ शिंदे यांना यश आले होते. आपला स्ट्राईक रेट चांगला असल्याचे एकनाथ शिंदे यांनी वारंवार सांगितले आहे.

आगामी निवडणुका या एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुका एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात लढवण्यात येतील असे स्पष्ट केले आहे. भाजप नेत्यांनीही आगामी निवडणुका शिंदेंच्याच नेतृत्वात लढल्या जातील असे सांगितले आहे. त्यामुळे महायुतीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे पारडे जड आहे. अशा परिस्थितीत अधिकाधिक जागा आपल्याला मिळाव्यात आणि त्यातील बहुतांश जागा निवडून आणाव्यात हा शिवसेनेचा प्रयत्न असेल. असे झाले आणि महायुतीची पुन्हा सत्ता आली तर तर शिवसेनेचाच मुख्यमंत्री करणे शक्य होईल.

गुरुवारी 'वर्षा'वर झालेल्या बैठकीमध्ये शिवसेना 110 जागांवर लढणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. शिवसेनेने 110 जागांची चाचपणी सुरू केली असून त्यासाठी प्रभारी आणि निरीक्षकही नेमले आहेत.  महायुतीमध्ये तणाव होऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी काही जागांची अदलाबदल करावी लागली तर त्यासाठी तयारी ठेवा असे आदेशही शिवसेना नेत्यांना दिले आहेत. ज्या जागांवर महायुतीमधला कोणताही पक्ष दावा करणार नाही अशा शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांना कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही कळते आहे. 

Advertisement

रामदास कदमांनी केली होती 100 जागांची मागणी

गेल्याच महिन्यात शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात भाषणात शिवसेना नेते रामदास कदम यांनी भाजपकडे 100 जागा मागा अशी मागणी केली होती. त्यांनी म्हटले होते की, "विधानसभेत गाफील राहू नका. भाजपला विनंती करा. वेळेवर एकनाथ शिंदे यांचे 15 उमेदवार 2 महिन्यांपूर्वी दिले असते तर आज चित्र वेगळे असते. शिंदेंचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर भाजपची मंडळी उठायची आमची जागा...आमची जागा. शिंदे साहेब हे थांबवा नाहीतर मला घेऊन जा. शिंदे साहेब मोदी- शाहांना सांगा, 100 उमेदवार द्या 90 आमदार नाही निवडून आणले तर तुम्ही सांगाल ते हरू."
 

राष्ट्रवादी काँग्रेसचीही 80-90 जागांची मागणी

विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादीला 80-90 जागा देण्याचा भाजपचा शब्द आहे. अजित दादा लोकसभेसारखी विधानसभेला खटपट होता कामा नये, आपला हक्काचा वाटा आपल्याला मिळाला पाहिजे, असे म्हणत छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी मेळाव्यात जागांची जाहीरपणे मागणी केली होती. महायुतीतील दोन्ही पक्षांनी आपापली संख्या जाहीर केली असल्याने जर ही संख्या प्रत्यक्षात आली तर भाजपच्या वाट्याला 98 जागा येतील.  गेल्या विधानसभा निवडणुकीत 105 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष बनलेल्या भाजपला हे मान्य असेल का ? हा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article