शिवसेना शिंदे गटाची एक महत्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीत मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या मंत्र्यांना आणि आमदारांना कानपिचक्या दिल्या आहेत. एक प्रकारे त्यांनी आपल्याच नेत्यांची शाळा घेतली. त्यात वादग्रस्त मंत्री आणि आमदारांचा समावेश होता. यावेळी त्यांनी अशा नेत्यांना निर्वाणीचा इशारा देत वेळीच सुधारा अन्यथा घरी जावं लागेल असा दम ही भरल्याचं सुत्रांची माहिती आहे. या बैठकीत शिंदे यांनी आपल्या नेत्यांना कमी बोलण्याचा सल्ला ही दिला आहे.
शिवसेनेच्या वादग्रस्त मंत्री आणि आमदारांना एकनाथ शिंदे यांनी कानपिचक्या देत खडे बोल सुनावले आहेत. गेल्या काही दिवसांत काही गोष्टी घडल्या. तुमच्याकडे दाखवलेलं बोट माझ्याकडे असतं. तुमचे आमदार काय करतात असा प्रश्न मला विचारला जातो. तुम्ही सगळी माझी माणसं आहात. आपलं कुटुंब एक आहे. तुमची बदनामी म्हणजे माझी बदनामी आहे. चुकीच्या गोष्टींवर एनर्जी वाया घालवू नका. कमी बोला जास्त काम करा, असा सल्ला या वेळी एकनाथ शिंदे यांनी पक्षाचे नेते, मंत्री आमदारांना दिला.
नक्की वाचा - Satara News: आली लहर केला कहर! नव्या गाडीचं सेलिब्रेशन, थेट महामार्गच रोखला, मग पुढे...
बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी जावं लागलं. असं सांगत अप्रत्यक्ष इशाराही द्यायला ते यावेळी विसरले नाहीत. आपल्या परिवारावर कारवाईचा बडगा उगारायला मला अजिबात आवडणार नाही. परंतु, मला कारवाई करायला तुम्ही भाग पडणार नाही, तसंच काम तुमच्याकडून अपेक्षित आहे. मी रागावत नाही. मी प्रमुखासारखं वागत नाही. कार्यकर्त्यासारखं वागतो. तुम्ही ही तसच वागा. आपल्या डोक्यात हवा जाऊ देता कामा नये असं ही त्यांनी यावेळी सांगितले.
कितीही पदं मिळाली तरी कार्यकर्ता आहे असं समजून कामं करा असं ही ते म्हणाले. आपल्याला कमी वेळात जास्त यश मिळालं आहे. लोकं आपल्या पाठीशी आहेत. त्यामुळे बदनामीचे डाव रचले जात आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यावी लागणार आहे. यापुढील काळ कसोटीचा आहे. सामाजिक जीवनात पथ्य पाळावी लागतात. ती काळजी घ्या, अन्यथा घात होण्याची शक्यता आहे. असं सांगत या बैठकीत त्यांनी आपल्या नेत्यांना सुचक इशारा दिला आहे.