ठाकरे गटाचे नेते काँग्रेसच्या नेत्यांवर भयंकर संतापले, जागावाटपाच्या बैठकीत जबरदस्त ड्रामा

जागावाटपाचा अद्याप निर्णय झालेला नाही मात्र काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये धुसफूस वाढायला लागली आहे.

Advertisement
Read Time: 3 mins
मुंबई:

महाविकास आघाडीच्या जागावाटपासाठी बैठका सुरू आहेत. जागावाटपाचा अद्याप निर्णय झालेला नाही मात्र काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये धुसफूस वाढायला लागली आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा अशी मागणी केली होती. काँग्रेसला त्यांची ही मागणी फारशी रुचलेली नव्हती. त्यांच्या या मागणीला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही विरोध केला होता आणि काँग्रेसनेही विरोध केला होता. खासकरून काँग्रेसच्या, गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या मागणीला विरोध केला होता. याचा राग बहुधा शिवसेना(उबाठा) नेत्यांच्या मनात कायम असावा. कदाचित यामुळेच महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या बैठकीत वादाचे प्रसंग निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. 

नक्की वाचा: जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी मविआ घेणार बाहेरची मदत, बैठकीत नेमकं काय ठरलं?

मीरा भाईंदर इथे काँग्रेसची कोकण विभागीय बैठक पार पडली होती. या मेळाव्यामध्ये बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस सर्वाधिक जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त केला होता. त्याचवेळी त्यांनी काँग्रेस सर्वाधिक जागा जिंकेल आणि काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल अशा आशयाचे त्यांनी विधान केले होते. थोरात यांचे हे विधान ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना फारसे आवडले नसावे त्यांनी थोरात यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, "लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्यामुळे महाविकास आघाडीचे नेते जिंकले हे लक्षात ठेवा." यावर थोरात यांनीही लगच प्रतिउत्तर दिले. ते म्हणाले की, "एकमेकांच्या मदतीनेच आपण सगळे जिंकलो हे विसरता कामा नये." संजय राऊत यांच्या विधानाबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारले असता त्यांनी म्हटले की आम्ही त्यांच्या विधानाला फारसे महत्त्व देत नाही. 

नक्की वाचा: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिपदावरून वाद चव्हाट्यावर, थेट शरद पवारांची मध्यस्थी

या सगळ्या वादामुळे संजय राऊत काँग्रेसवर काहीसे नाराज झाले आहेत. त्यांनी आपली नाराजी काँग्रेस नेत्यांवर थोड्या वेगळ्या पद्धतीने व्यक्त केली. शिवसेना(उबाठा)चे नेते जागावाटपासाठी नुकतीच मुंबईत एक बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसच्या नेत्यांबद्दल जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. कारण होतं ते म्हणजे बैठकीला वेळेवर न येण्याचे. काँग्रेसचे नेते जागावाटपाच्या बैठकीसाठी वेळेवर येत नाही, ते इतर कार्यक्रमात व्यस्त असतात अशी टीका राऊत यांनी केली होती. जागावाटपाचा निर्णय घेण्यासाठी 3 दिवस बैठका झाल्या.  यात 125 पेक्षा अधिक जागांवरील तिढा सुटल्याचा दावा केला जातोय. उर्वरीत जागांवरून अजूनही वाद कायम आहे. हा वाद कायम असताना महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये वादाच्या ठिणग्या वारंवार पडायला लागल्याचे दिसत आहे. 

ठाकरे गटाच्या 'अरे'ला 'कारे' करण्याची काँग्रेसची भूमिका

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा अशी मागणी केल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) हे दोन्ही पक्ष काहीसे सावध झाले. यापूर्वी उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री झाले होते तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला महाराष्ट्रात चांगलीच तरतरी आलेली दिसत आहे. काँग्रेसने केलेल्या चाचपणीमध्ये महाविकास आघाडीत त्यांनाच सगळ्यात जास्त जागा मिळण्याची शक्यता दिसू लागली आहे. काँग्रेसचे नेते खासगीत बोलताना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस हाच पहिल्या क्रमांकाचा पक्ष असेल असे सांगत आहेत. पहिल्या क्रमांकाचा पक्ष असूनही जर मित्र पक्षाकडे मुख्यमंत्रीपद गेलं तर पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळेच काँग्रेसनेही आतापासूनच ज्याच्या जास्त जागा त्या पक्षाचा मुख्यमंत्री असे सांगून वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे सर्वाधिक अडचण ही उद्धव ठाकरेंची होणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत. 

Topics mentioned in this article