
संकेत कुलकर्णी
लोकसभेनंतर विधानसभेलाही माढ्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोहिते पाटील उमेदवार असणार अशी जोरदार चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे उमेदवार म्हणून मोहिते पाटील यांचा चेहरा माढा विधानसभेच्या आखाड्यात पुढे येतोय. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे दुसरे पुतणे शिवतेजसिंह मोहिते पाटील माढा विधानसभा लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी तशी इच्छाही व्यक्त केली आहे. मोहिती पाटील यांच्या शिवाय शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळावी यासाठी अनेकांनी इच्छा व्यक्त केली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघ चांगलाच गाजला. विधानसभेच्या दृष्टीने देखील माढा मतदार संघाची वरचेवर चर्चा होत आहे. अशातच या मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे रणजीत शिंदे, धनराज शिंदे ,अभिजीत पाटील, संजय कोकाटे असे उमेदवार इच्छुक आहेत. आता विजयसिंह मोहिते पाटील यांचे दुसरे पुतणे शिवतेजसिंह मोहिते पाटील देखील इच्छुक आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीपासून शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी माढा विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले होते. परिणामी आता त्यांनी थेट राष्ट्रवादी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली असल्याचे समजते.
माढा मतदार संघात विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांनी लोकसभा लढवली. मोठा विजय प्राप्त केला. यानंतर आता मोहिते पाटील यांनी आपला मोर्चा विधानसभेच्या दृष्टीने वळवला आहे. त्यामुळे शरद पवारांनी मोहिते पाटलांना तिकीट दिले तर माढा मतदारसंघाची निवडणूक पुन्हा एकदा राज्यातील हाय व्होल्टेज लढत ठरू शकते. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचा सामना राष्ट्रवादी अजित पवार गटाशी माढ्यात होऊ शकतो. त्यामुळे माढ्याच्या राजकारणात विरोधकांना थोपवण्यासाठी पुन्हा एकदा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून मोहिते पाटीलच असतील. अशी चर्चा आता सुरू झाली.
माढा विधानसभा मतदार संघातून उमेदवारी मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात चांगलीच चुरस आहे. अनेक इच्छुकांनी शरद पवारांची भेटही घेतली आहे. त्यांनी उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नही सुरू केले आहेत. रणजीत शिंदे, धनराज शिंदे ,अभिजीत पाटील, संजय कोकाटे यांचा यात समावेश आहे. त्यात आता शिवतेजसिंह मोहिते पाटील यांची भर पडली आहे. त्यामुळे नक्की उमेदवारी कोणाला द्यायची हा प्रश्न पक्षा समोर आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world