![Jitendra Awhad: 'शरद पवारांनी कसं वागावं हे त्यांनी सांगू नये' आव्हाडांनी राऊतांचे कान टोचले Jitendra Awhad: 'शरद पवारांनी कसं वागावं हे त्यांनी सांगू नये' आव्हाडांनी राऊतांचे कान टोचले](https://c.ndtvimg.com/2025-02/ketgk978_jitendra-awhad-_625x300_13_February_25.jpg?im=FitAndFill,algorithm=dnn,width=773,height=435)
एकनाथ शिंदे यांचे शरद पवारांनी केलेले कौतूक शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे. त्यातून संजय राऊत यांनी थेट शरद पवार यांच्यावरच निशाणा साधला आहे. पवारांनी शिंदेंचे केलेल्या कौतूकाबद्दल नाराजीही व्यक्त केली आहे. त्यानंतर राज्यातलं राजकारण चांगलचं तापलं आहे. पवारांवर केलेल्या टीकेमुळे शिवसेना शिंदे गटाने संजय राऊतांना लक्ष्य केलं. त्यानंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही संजय राऊत यांच्या बरोबर शिवसेनेच्या नेत्यांचे कान टोचले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांवर हल्लाबोल करताना काही सल्लेही दिले आहेत. शरद पवारांचे वय आणि राजकीय अनुभव ही खूप आहे. त्यांच्या मनात कधी सूड नाही. ते जे काही बोलतात त्यांना माहित असतं. बाळासाहेब ठाकरे आणि त्यांची मैत्री होती. पण बाळासाहेब नेहमी शरद पवारांवर टोकाची टीका करत होते. पण ती टीकाही पवारांनी सहन केली होती. राजकारण तर होतच होते. संवाद होता. असं असताना शरद पवारांबाबत बोलणं चुकीचं होतं असं आव्हाड म्हणाले.
तुमची लोकं ही देवेंद्र फडणवीस यांना जावून भेटतात, ते तुम्हाला चालतं का असा प्रश्नही आव्हाड यांनी या निमित्ताने उपस्थित केला. तुमचे लोक अजित पवारांनाही भेटतात. त्यामुळे तुम्ही एखाद्याला भेटले म्हणजे तुम्ही त्यांचे होतात असे नाही. उलट भेटीगाठी मुळे संवाद वाढतो. संवाद हा असलाच पाहीजे असंही ते म्हणाले. पण अलीकडच्या काळात हा संवाद तुटला आहे. विरोधक दिसला की उचलून जेलमध्ये टाकला अशी स्थिती आहे. या राजकारणाला छेद देण्याचे ध्येय शरद पवारांचे आहे, असं आव्हाड म्हणाले.
राजकारणात मतभेद असतात. पण एकमेकाला भेटल्याने आणि बोलल्याने मन साफ होतं. शिवसेना फोडण्याचा आणि सरकार पाडण्याच्या वेदना त्यांच्या मनात आहेत. हे मान्य आहे. पण म्हणून शरद पवारांनी कसं वागावं हे त्यांनी सांगू नये असं आव्हाड थेट म्हणाले. शिवाय ज्या वेळी शरद पवार हे अजित पवारांच्या व्यासपीठावर असतात त्यावेळी आम्हालाही राग येतो. वेदना होतात. पण या गोष्टी राजकारणात होत असतात असंही त्यांनी स्पष्ट केलं.
या पार्श्वभूमीवर आव्हाड यांनी एक सुचक ट्वीटही केले आहे. त्यात ते म्हणतात. आदरणीय शरद पवार साहेबांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांचा सत्कार केला अन् त्यामुळे बराच गदारोळ माजला. आदरणीय पवारसाहेबांचा स्वभाव हा राजकारणातही आदर्शवतच आहे. ते कधीच वैयक्तिक द्वेष, सूड, आसुया मनातही ठेवत नाहीत. राजकीय - वैचारिक वैर ते सोडतही नाहीत. पण, कुणाबरोबर मंच सामाईक करणे त्यांनी आजवर टाळलेलेही नाही. अनेकांबरोबर त्यांचे वैचारिक मतभेद असले तरी वेगवेगळ्या कामांसाठी त्यांनी त्या-त्या माणसांसोबत जुळवून घेतले आणि त्यातून मार्ग काढला आहे.
ट्रेंडिंग बातमी - शिंदेंची खेळी, ठाकरे गटाला गळती! राजन साळवींच्या पक्षप्रवेशाआधी नाशिकमध्येही खिंडार
सगळ्याच मंचावर राजकारण मनात ठेवावे, असे मलाही गरजेचे वाटत नाही. खरंतर सर्वात जास्त राग मला यायला पाहिजे; कारण, सर्वात जास्त छळ माझाच झाला आहे. निधी मिळत नाही, खोट्या पोलीस केसेस टाकल्या जातात. तरीही, आदरणीय शरद पवार साहेबांकडून सर्वांनीच शिकावे की, सूड, द्वेष आणि आसुया हे राजकारणात असताच कामा नये. आता लाखभर मतांनी जिंकलो असलो तरी हे सरकार आम्हाला निधी काही देणार नाही अन् ज्यांचे डिपॉझिट जाता-जाता वाचले, त्यांचा उदोउदो करून त्यांच्या नावाने निधी पाठवणार असे ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world