जरांगेंवर ड्रोनद्वारे पाळत ठेवल्याचा आरोप, विशेष पथक करणार प्रकरणाची चौकशी

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या अंतरवाली सराटीतील उपोषण आंदोलन स्थळाची आणि अंतरवाली सराटीच्या सरपंचांच्या घराची ड्रोनच्या साह्याने टेहाळणी केली जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

Advertisement
Read Time: 3 mins
मुंबई:

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील ज्या गावात उपोषण केले होते, त्या अंतरवाली सराटीमध्ये जरांगेंच्या उपोषण स्थळाची आणि या गावच्या सरपंचांच्या घराची ड्रोनद्वारे पाळत ठेवल्याचा आरोप केला जात आहे. सदर मुद्दा गुरुवारी विधानसभेत उपस्थित करण्यात आला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हा मुद्दा उपस्थित करत चिंता व्यक्त केली. यावर उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तर देताना, म्हटले की सदर आरोपांची एका विशेष पथकाद्वारे चौकशी करण्यात येईल.   

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

विरोधी पक्षनेत्यांनी मांडलेल्या मुद्दानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी जरांगे यांना सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात यावी असे निर्देश दिले. यावर बोलताना मंत्री देसाई यांनी विधानसभेत बोलताना म्हटले की, "जरांगे यांना पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे." जालना पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. देसाई यांनी सांगितले की पोलिसांच्या पथकाने अंतरवाली सराटीत जावून पाहणी केली आहे. त्यांना त्यावेळी कोणतेही ड्रोन दिसले नाहीत. जालना जिल्हा पोलिसांनी त्यांचा पाहणी अहवाल सरकारला सादर केला आहे. मात्र तरीही अतिरिक्त पथक गावात जाऊन पुन्हा पाहणी करेल आणि अहवाल सादर करेल असे देसाई यांनी सांगितले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - 'ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री दाखवा अन् 1 गावठी कोंबडा, वलगणीचे मासे बक्षीस मिळवा'

जालन्यातील अंतरवाली सराटी गावात जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्ट 2023 पासून आंदोलनाला सुरुवात केली. आंदोलनादरम्यान जरांगे पाटील यांच्या आंदोलन स्थळी पोलिसांनी लाठीहल्ला केला आणि तिथून हा वाद पेटला होता. एका गावातून सुरू झालेल्या या आंदोलनाचे लोण राज्यभरात पसरलं होतं. जरांगे यांनी कडक भूमिका घेत आंदोलन मोठे केले होते. मुंबईवर धडकमोर्चाही काढण्यात आला होता. मात्र मुंबईच्या वेशीवर नवी मुंबईत मुख्यमंत्र्यांना जरांगेंचे मन वळवण्यात यश आले होते. यानंतर राज्यभर दौरे करत जरांगेंनी मराठा समाजाची एकजूट करण्यासाठी लोकसभा निवडणुकीत समाजाच्या विरुद्ध जाणाऱ्या पक्षाच्या उमेदवारांना पाडा अशी भूमिका घेतली. याचा परिणाम महाराष्ट्रासह मराठावड्यात पाहायला मिळाला.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - वसंत मोरेंचं ठरलं! इंजिन सोडलं, रोड रोलरवर चढले,आता हाती मशाल घेणार

लोकसभा निवडणुकीनंतर जरांगे यांनी पुन्हा अंतरवाली सराटी गावातून आंदोलनाची हाक दिली. सरकारच्या शिष्ट मंडळाने जरांगे यांच्याकडे एक महिन्याची मुदत मागितली होती. सग्या सोयऱ्याच्या अध्यादेशाची अंमलबजावणी  करण्याचं आश्वासन दिलं. यानंतर जरांगे पाटील यांनी 13 जुलैपर्यंत आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. 6 जुलै ते 13 जुलैपर्यंत मराठ्यांच्या महाशांती रॅलीच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करण्याचा निर्णय घेत अंतरवाली सराटी गावात मराठवाड्यातील मराठा कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या असताना जरांगे पाटील यांच्यावर ड्रोनच्या माध्यमातून करडी नजर ठेवली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

Advertisement