शिवसेनेचा 58 व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाच्या दोन्ही गटाचे मेळावे मुंबईत झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा मेळावा वरळीमधील डोममध्ये झाला. तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात पार पडला. षण्मुखानंदमधील सभेत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विधानसभा निवडणुकीचा प्रचार आत्तापासून सुरु करा, असं आव्हान दिलं. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचं नाव आणि चिन्ह बाजूला ठेवावं. त्यांनी त्यांच्या वडिलांचा फोटो लावून निवडणूक लढवावी, असं सांगत उद्धव यांनी यावेळी राज ठाकरेंनाही नाव न घेता टोला लगावला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
'मोदींकडं अहंकार आहे
तुम्ही सर्वांनी माझं कौतुक केलंय. मला विजयाचं श्रेय मला दिलं. पण मी शून्य आहे. यशाचे मानकरी तुम्ही आहात. आत्मविश्वास आणि अहंकारमध्ये फरक आहे. मी हे करु शकतो हा आपल्यात आत्मविश्वास आहे. जगात फक्त मी हे करु शकतो, हा अहंकार आहे, तो मोदींकडं आहे.
NDA मध्ये जाणार हा गैरसमज
निवडणूक झाली की उद्धव ठाकरे पुन्हा एनडीएत जाणार हा गैरसमज पसरवण्यास सुरुवात केली. ज्यांनी आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला. आपल्या मातेसमान शिवसेनेला संपवायचा प्रयत्न केला. त्यांच्यासोबत परत जायचं? असा सवाल करत ठाकरे यांनी NDA मध्ये जाण्यााची चर्चा फेटाळून लावली. तुम्ही तुमचं पाहा. भुजबळ शिवसेनेत जाणार याची चर्चा सुरु झाली. मी भुजबळांशी बोललो नाही किंवा भुजबळ माझ्याशी बोलले नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं.
हे सरकार चालेल असं वाटत नाही. हे चालू नये असं माझं मत आहे. हे सरकार पडलंच पाहिजे. पुन्हा निवडणुका झाल्याच पाहिजेच. शिवसेनेला सर्व देशभक्तांची मतं मिळाली. त्यामध्ये मुस्लीम, दलित, बौद्ध सर्वच आले. इथं डोमकावळे बसले आहेत, त्यांची कावकाव सुरु झालीय. संविधान वाचवण्यासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी आम्हाला मतदान केलंय. मोदी आणि भाजपानं सत्तेसाठी हिंदुत्व सोडलंय, असा आरोप ठाकरे यांनी केला.
तुम्ही 2014 चा NDA चा फोटो पाहा. आत्ताचे मोदींचे सहकारी नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू हे काही हिंदुत्ववादी आहेत का? चंद्राबाबू नायडू यांचा जाहीरनामा मोदींनी वाचावा, असं मी आव्हान देतो. त्यांनी आंध्र प्रदेशातील मुस्लीम समाजाला आश्वासनं दिले आहेत.
शहरी नक्षलवाद्यापेक्षा गंभीर
मोदी शाह सत्तेचा गैरवापर करतायत. आमच्या कार्यकर्त्यांच्या घरी ED पाठवता. सत्तेचा दुरोपयोग करणे, चांगली चालत असलेली सरकार पाडायची. त्यांना सत्तेत घेऊन सरकार स्थापन करायची हा शहरी नक्षलवाद्यांपेक्षा गंभीर प्रकार आहे, असा आरोप ठाकरेंनी केला.
मोदींना थेट आव्हान
विधानसभेचा प्रचार आत्तापासून सुरु करा, हे माझं मोदींना आव्हान आहे. फक्त या षंढांना बाजूला ठेवा. शिवसेनेचं नाव, शिवसेनेचं चिन्ह बाजूला ठेवा, असं आव्हान त्यांनी पंतप्रधान मोदींना दिलं. मिंदे आणि भाजपला सांगतो तुम्ही षंढ नसाल तर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो, शिवसेनेचा धनुष्यबाण आणि शिवसेना नाव न लावता निवडणूक लढा. मिंदेच्या वडिलांचा फोटो लावा आणि निवडणूक लढवा. विधानसभेसाठी मोदी तुम्ही सभा घ्या.. या मिंदेला बाजूला ठेवा, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मला विरोध करण्यासाठी काही जणांनी मोदींना उघड म्हणजेच बिनशर्ट पाठिंबा दिला, असा टोला त्यांनी राज ठाकरे यांचं नाव न घेता लगावला.
सुधीर मुनगंटीवार यांची नखं आम्ही चंद्रपूरमध्ये उखडले आणि तुम्ही शिवाजी महाराजांचे वाघनखे आणताय? असा सवाल करत तुम्ही पाठीमागून वार करणार असाल तर आम्ही वाघनखं काढू असा इशारा ठाकरे यांनी या भाषणात दिला.
मोदींचा खुळखुळा केला
या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंपूर्वी खासदार संजय राऊत यांचंही भाषण झालं. त्यांनी या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. 'नरेंद्र मोदींचा खुळखुळा कुणी केला असेल तर तो उद्धव ठाकरेंनी केला आहे, अशी टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी लगावला. मोदी आधी एक ब्रँड होता पण आता ती देशी ब्रँडी झाली आहे. देशभरातील विविध पक्ष फोडून भाजपने 110 विजय चोरले आहेत, नाहीतर भाजप 120 वर अडकलाय. जिथे जिथे मंदिर आणि हिंदुत्व तिथे भाजप हरले. जिथे राम तिथे त्यांचा पराभव झाला,' अशी टीका राऊत यांनी केली.