संजय शिरसाट हे आपल्या वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. ते अनेक वेळा आपल्या वक्तव्याने अडचणीतही आले आहेत. आता त्यांचे एक वक्तव्य चांगलेच चर्चेत आहे. शिवाय त्यामुळे राज्याचे राजकारण मात्र तापलं आहे. महायुतीत तर जुंपली आहेच पण शिवसेना शिंदे गटातला अंतर्गत वादही या निमित्ताने उफाळून आला आहे. या सर्वावर मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शांत आहेत. त्यांनी कोणतीही प्रतिक्रीया दिली नाही. त्यामुळे पडद्यामागे काही सुरू आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें महायुतीत नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. त्याच वेळी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र यायला पाहीजेत. त्यासाठी आपण प्रयत्न करू असं विधान सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केलं. शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र येण्याच्या संदर्भात मंत्री संजय शिरसाट यांनी भाष्य केलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, “मला वाटतं उद्धव ठाकरे यांनी दोन पावलं मागे आलं पाहिजे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचं सुत जमेल असं वाटत नाही. मात्र, यासाठी प्रयत्न करण्याची आपली तयारी असल्याचं संजय शिरसाट म्हणाले होते. दोन्ही शिवसेने एकत्र याव्या असं आपल्याला वाटतं असंही ते म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - CIDCO Lottery 2025 : सिडकोचे माझे पसंतीचे घर! प्रतिक्षा संपली लॉटरीची तारीख ठरली
त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद महायुतीत उमटायला सुरूवात झाले. भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी याबाबत आपली प्रतिक्रीया दिली. संजय शिरसाटांनी ही प्रतिक्रीया देण्या आधी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांची मतं जाणून घेतली पाहीजे होती. संजय शिरसाट हे आमचे मित्र आहेत. त्यांचा संजय राजाराम राऊत होऊ नये इतकीच अपेक्षा. असा टोलाही त्यांनी या निमित्ताने शिरसाट यांना लगावला आहे. तर मला नितेश राणेंची काळजी घ्यावी लागेल असं प्रत्युत्तर शिरसाट यांनी ही दिलं आहे. त्यामुळे महायुतीत कुठेना कुठे ठिणगी पडल्याचे दिसते.
एकीकडे भाजपने याबाबत स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली असताना शिंदेंच्या शिवसेनेतला अंतर्गत वादही यानिमित्ताने समोर आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी, शिरसाट काय बोलतात याला काही महत्व नाही. एकनाथ शिंदे यांनी जेव्हा उठाव केला तेव्हा आम्ही सर्व अधिकार हे एकनाथ शिंदे यांना दिले होते. त्यामध्ये पक्षाबाबतचे सर्व अधिकार फक्त एकनाथ शिंदे यांनाच दिलेले आहेत. ते अधिकार दुसरे कोणालाही नाहीत. त्यामुळे संजय शिरसाट हे काय म्हणतात त्याला महायुतीमध्ये काही महत्व नाही. ते जे काही बोलले हे त्यांचं वैयक्तिक मत आहे असं म्हणत शिरसाटांना आरसा दाखवण्याचं काम कदम यांनी केलं.
या संपुर्ण वादावर एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत काही प्रतिक्रीया दिलेली नाही. मात्र त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यावर व्यक्त झाले आहेत. उद्धव ठाकरे हे काँग्रेसची साथ सोडणार आहेत का? ते काँग्रेसचे विचार सोडायला तयार आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. तर शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी राजकारणात काही होवू शकतं असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे संपुर्ण राजकीय वातावरण तापलेलं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. दरम्यान शिरसाटांच्या विधानाची राजकीय पार्श्वभूमी चांगलीच रोचक आहे. शिवसेनाचे दोन्ही गट विधानसभा निवडणुकीनंतर त्यांच्या मित्रपक्षांवर नाराज असल्याचं चित्र आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या विधानाला एक वेगळं महत्व निर्माण झालं आहे.