रामराजे शिंदे
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे दिल्लीत तीन दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात महत्त्वाच्या नेत्यांशी उद्धव ठाकरे भेट घेणार आहेत. ठाकरे यांचा हा दौरा आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाचा समजला जात आहे. या दौऱ्यात ठाकरे इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. शिवाय विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबतही या दौऱ्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. ठाकरे यांच्या या दौऱ्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
संसदेच्या अधिवेशनावेळी उद्धव ठाकरे यांचा हा दुसरा दिल्ली दौरा आहे. मागील हिवाळी अधिवेशन दरम्यान दिल्लीत आल्यानंतर महाविकास आघाडीच्या खासदारांशी उद्धव ठाकरेंनी भेटी घेतल्या होत्या. परंतु या दौऱ्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्याचे कारण म्हणजे येऊ घातलेल्या विधानसभा निवडणूका आहेत. विधानसभेत महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार असल्याचा संदेश महायुतीला द्यायचा आहे त्यासाठी हा दौरा महत्वाचा समजला जात आहे. त्यामुळेच जाणीव पूर्वक ठाकरे यांनी दिल्लीची निवड केली आहे.
उद्धव ठाकरे 6 ॲागस्टला दिल्लीत संध्याकाळी चार वाजता दाखल होती. तिथून ते थेट खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी पाच वाजेपर्यंत पोहोचतील. त्यानंतर दिल्लीत पक्षाच्या राज्यसभा आणि लोकसभा खासदारां बरोबर त्यांची बैठक होणार आहे. ही बैठक आटोपल्यानंतर ठाकरे हे पत्रकारांबरोबर बोलणार आहेत. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे यांची सोनिया गांधी आणि राहुल गांधीसोबत बैठक होणार आहे. ही बैठक झाल्यानंतर ते आम आदमी पार्टी, आरजेडी, समाजवादी पार्टीत्या नेत्यांसोबत बैठक करणार आहे. त्याच दिवशी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचीही उद्धव ठाकरे भेट घेतील. त्याच दिवशी शरद पवार यांच्यासोबत ही बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
ट्रेंडिंग बातमी - Sheikh Hasina शेख हसीनांना भारत मदत करणार की नाही ? परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले...
दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी उद्धव ठाकरेहे उपराष्ट्रपतींच्या निवासस्थानी त्यांची भेट घेणार आहे. त्यानंतर इतर महत्त्वाच्या व्यक्तींसाठी वेळ आरक्षित ठेवण्यात आला आहे. केंद्रीय तपास यंत्रणेकडून विरोध पक्षांच्या नेत्यांना टार्गेट केलं जात आहे. अरविंद केजरीवाल अद्यापही जेल मध्येच आहेत. शिवाय मनीष सिसोदीया यांना दिलासा मिळाला नाही. ईडी, सीबीआय गैरवापर बाबत आम आदमी पार्टी आणि इतर पक्षांच्या नेत्यांशी उद्धव ठाकरे चर्चा करण्याची शक्यता आहे. या बैठकांमधून राज्यातील महाविकास आघाडी आणि राष्ट्रीय स्तरावर इंडिया आघाडी मजबूत असल्याचा संदेश दिला जाणार आहे.उद्धव ठाकरे यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे असणार आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंब तीन दिवस दिल्लीत असणार आहे. उद्धव ठाकरे तिन्ही दिवस संजय राऊत यांच्या निवासस्थानी असणार आहेत. तिथेच महत्त्वाच्या नेत्यांसोबत डिनर डिप्लोमसी होईल.
विधानसभा निवडणूका डोळ्यांसमोर आहेत. त्या निमित्ताने या भेटीत सीट शेअरिंग फॅार्म्युला ठरवला जाण्याची शक्यता आहे. राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे तिघेही भेटणार आहेत. यातूनच महाराष्ट्र विधानसभेची रणनीतीही ठरविली जाणार असल्याची माहिती आहे. शिवाय संसदेत विरोधक आक्रमक आहेत. बजेट मध्ये बिहार आणि आंध्र प्रदेशला झुकते माप दिल्यामुळे विरोधक संतप्त आहेत. नीट पेपर लीक प्रकरण, युपीएससी परीक्षेतील त्रुटी, आरोग्यविमा वरील जीएसटी अशा अनेक मुद्द्यांवर सरकार कात्रीत सापडलं आहे. त्यातच उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यामुळे विरोधाला धार येणार आहे.त्यामुळे ठाकरेंच्या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.