अजित पवारांच्या घोषणेचे भाजपामध्ये पडसाद, फडणवीसांचा जवळचा हाती घेणार तुतारी?

अजित पवारांनी महायुतीचा पहिला उमेदवार जाहीर करताच त्याचे पडसाद भाजपामध्ये उमटण्यास सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचा नेता आगामी निवडणुकीत बंडखोरी करुन शरद पवार गटात जाण्याची शक्यता आहे. 

Advertisement
Read Time: 2 mins
कोल्हापूर:

विशाल पुजारी, प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टी-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीनं विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. अजित पवार यांनी यामध्ये आघाडी घेत कोल्हापूर जिल्ह्यातील कागल मतदारसंघात हसन मुश्रीफ यांना उमेदवारी जाहीर केली आहे. अजित पवारांनी महायुतीचा पहिला उमेदवार जाहीर करताच त्याचे पडसाद भाजपामध्ये उमटण्यास सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचा नेता आगामी निवडणुकीत बंडखोरी करुन शरद पवार गटात जाण्याची शक्यता आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कसं आहे कागलचं राजकारण?

कागल मतदारसंघात गेल्या अनेक निवडणुकांमध्ये हसन मुश्रीफ विरुद्ध समरजीत सिंह घाटगे अस शीतयुद्ध होतं. मात्र लोकसभा निवडणुकीत दोन्ही नेते एकत्र आले. महायुती म्हणून दोन्ही नेत्यांची वाटचाल सुरू झाली. अगदी लोकसभा पार पडेपर्यंत मांडीला मांडी लावून हे नेते बसत होते. मात्र जशी खासदारकीची निवडणूक संपली तशी दोन्ही नेत्यांमधली विधानसभेची रस्सीखेच पुन्हा सुरू झाली. लोकसभा पार पडताच भाजपनेचे समरजीत सिंह घाटगे यांनी आपली उमेदवारी घोषित करून टाकली. या टर्मचा मीच आमदार असणार असा विश्वास कार्यकर्त्यांना दिला.

घाटगेंच्या या भूमिकेनंतर कागल मतदार संघातील आमदारकीची निवडणूक पुन्हा चर्चेत आली. याच मतदारसंघात लोकसभेनंतर ठाकरे गटाचे नेते संजय घाटगे यांच्या नावामुळे तिरंगी लढत होईल अशी चर्चा रंगली होती. मात्र शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय घाटगे यांनी महायुतीलाच पाठिंबा देणार असे जाहीर केल्यानंतर खुद्द मुश्रीफांनी देखील त्यांचे आभार मानले.

( नक्की वाचा : अजित पवार 'तसे' नाहीत, राज ठाकरेंनी सांगितला नेमका फरक )

कागल मतदारसंघात गेल्या 5 टर्म अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ हे आमदार राहिलेले आहेत. आता सहावी टर्म विजयी होण्यासाठी मुश्रीफ सज्ज झालेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी कागलच्या मेळाव्यात मुश्रीफांची उमेदवारीच जाहीर करून टाकली. येणाऱ्या विधानसभेत मुश्रीफना विजयी करण्यासाठी सज्ज व्हा असं आवाहन मेळाव्यात कार्यकर्त्यांना केलं. अजित पवारांनी ही घोषणा करताच समरजीत सिंह घाटगे बंडखोरी करणार का ही चर्चा सुरु झाली आहे. 

Advertisement

समरजीत सिंह घाटगे हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे नेते मानले जातात. त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक शरद पवार गटाकडून लढावी असा प्रस्ताव त्यांना मिळाल्याची चर्चा मतदारसंघात सुरु आहे. घाटगे यांनी या सर्व चर्चांवर अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. पण, घाटगे यांनी हा प्रस्ताव स्विकारला तर कागलची निवडणूक राज्यात लक्षवेधी ठरणार आहे.