समाधान कांबळे
हिंगोली जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांपैकी हिंगोली हा एक विधानसभा मतदार संघ आहे. हिंगोली आणि सेनगाव या दोन तालुक्यांनाचा मिळून हा मतदार संघ तयार झालेला आहे. भौगोलिक दृष्ट्या विस्तीर्ण अशा या भागात अनेक वस्ती-तांडे आहेत. त्यांचे अनेक प्रश्नही आहेत. त्याच बरोबर हिंगोली विधानसभा मतदारसंघातील लोकसंख्येचा विचार केला तर मराठा मतदारांसह दलित,मुस्लिम मतदारांचा हा मतदार संघ आहे. भाजपाचे तान्हाजी मुटकुळे हे विद्यमान आमदार आहेत. त्यांनी सलग दोन वेळा या मतदार संघात विजय मिळवला आहे. या वेळी त्यांच्या समोर महाविकास आघाडीचे आव्हान असेल. मात्र जागा वाटपात हा मतदार संघ कोणाच्या वाट्याला जाणार यावर पुढील गणित ठरणार आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर हिंगोली विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदललेली दिसत आहेत. सध्या हिंगोली विधानसभेची जागा भाजपकडे असली तरीही स्थानिक पातळीवर भाजप आणि काँग्रेस मधून अनेक जण इच्छुक आहेत. तर या वेळेस शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने देखील या मतदारसंघावर आपला दावा केला आहे. त्यामुळे जागा वाटपात हा मतदार संघ कोणाच्या वाट्याला जातो हे महत्वाचे ठरणार आहे. सर्वच पक्षांनी या मतदार संघावर दावा केला आहे. काँग्रेस आघाडीत या मतदार संघासाठी प्रबळ दावेदार समजला जात आहे.
ट्रेंडिंग बातमी - हर्षवर्धन पाटील लढणार की माघार घेणार? इंदापूर विधानसभा कोणाच्या पारड्यात?
काँग्रेसकडून हिंगोली विधानसभेसाठी तीन टर्म आमदार राहिलेले माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर इच्छुक आहेत. उमेदवारी मिळाल्यास आपण निश्चित निवडून येवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र असं असलं तरी हिंगोली विधानसभेत काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी असल्याचं सर्वत्र दिसत आहे. भाऊराव पाटील गट आणि सातव गट असे हे दोन गट आहेत. सातव गटाचा भाऊराव पाटील यांना विरोध आहे. सातव गटाकडून प्रकाश थोरात आणि सुरेश आप्पा सराफ हे इच्छुक आहेत.
ट्रेंडिंग बातमी - केज मतदार संघात भाजपची डोकेदुखी वाढणार? राखीव मतदार संघात कोण बाजी मारणार?
तर भाजपकडून लोकसभेसाठी इच्छुक असलेले रामदास पाटील सुमठाणकर हे देखील हिंगोली विधानसभा मतदारसंघात तिकीट मिळावे यासाठी ऍक्टिव्ह मोडवर आहेत. कोणत्याही परिस्थितीत आपण ही निवडणूक लढवणार म्हणजे लढणार असा निर्धार त्यांनी केला आहे. रामदास पाटील हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. हिंगोली लोकसभेमध्ये त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना माघार घेण्यास सांगितले होते. लोकसभा निवडणुकीमध्ये पाटील यांची संधी हुकली मात्र त्यामुळे आता त्यांनी हिंगोली विधानसभेची मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. महायुतीकडून उमेदवार कोण हा तिढा कायम असणार आहे. भाजपचे विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे हे पण निवडणूक रिंगणात उतरण्यास सज्ज आहे. त्यांनी हॅटट्रीक करण्याची संधी आहे.
ट्रेंडिंग बातमी - गोंदिया विधानसभेत कमळ फुलणार? दोन अग्रवाल एकमेकांना भिडणार?
2019 च्या विधानसभा निवडणुकीत तान्हाजी मुटकुळे यांनी काँग्रेसच्या भाऊराव पाटील गोरेगावकर यांचा पराभव केला होता.
तान्हाजी मुटकुळे यांना 95 हजार 318 मते मिळाली होती. तर भाऊराव पाटील गोरेगावकर यांना 71 हजार 253 मते मिळाली होती. वीस हजाराच्या फरकाने मुटकुळे विजयी झाले होती. विशेष म्हणजे तानाजी मुटकुळे यांची मते 2014 च्या निवडणूक पेक्षा 2019 मध्ये वाढलेली होती. यावेळी ही निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये असणार आहे. त्यामुळे मुटकुळे यांच्या पुढे विरोधकां बरोबरच स्वपक्षियांचेही आव्हान असणार आहे. आघाडी की महायुतीमध्ये या मतदार संघात कोण बंडखोरी करतो यावरही इथल्या लढतीचे भवितव्य ठरणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world