जाहिरात

हर्षवर्धन पाटील लढणार की माघार घेणार? इंदापूर विधानसभा कोणाच्या पारड्यात?

इंदापूर मतदार संघातून विद्यमान आमदार दत्ता भरणे यांच्यासह भाजपचे हर्षवर्धन पाटील हे ही इच्छुक आहेत.

हर्षवर्धन पाटील लढणार की माघार घेणार? इंदापूर विधानसभा कोणाच्या पारड्यात?
पुणे:

देवा राखुंडे 

राज्यातले काही विधानसभा मतदार संघ सध्या चर्चेत आहेत. त्या पैकी एक मतदार संघ म्हणजे पुणे जिल्ह्यातील इंदापूर विधानसभा मतदार संघ. या मतदार संघात सध्या कोण उभं राहाणार? महायुतीत मतदार संघ कोणाला सुटणार याचीच जोरदार चर्चा सुरू आहे. मतदार संघ कोणालाही सुटला तरी इच्छुकांनी मात्र निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पक्षानं दिलं तर पक्षाकडून नाही तर अपक्ष लढण्याची मानसीकता यामतदार संघातल्या इच्छुकांनी केल्याची सध्याची स्थिती आहे. या मतदार संघातून विद्यमान आमदार दत्ता भरणे यांच्यासह भाजपचे हर्षवर्धन पाटील हे ही इच्छुक आहेत. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

महायुतीत जागेसाठी रस्सीखेच 

इंदापूर विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे  विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे आणि भारतीय जनता पार्टीचे नेते हर्षवर्धन पाटील हे इच्छुक आहेत. मात्र महायुतीत ही जागा कोणाच्या वाट्याल जाते यावर या दोघांचेही भवितव्य ठरणार आहे. 2014 पासून इंदापूर विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहीले आहे. महायुतीच्या जागा वाटपात इंदापूरची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे नेते हर्षवर्धन पाटील हे सध्या अपक्ष उमेदवारीची तयारी करत आहेत. या सोबतच हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात देखील प्रवेश करू शकतात अशी चर्चा आहे. मागिल दोन निवडणुकीत हर्षवर्धन पाटील विरूद्ध दत्ता भरणे अशीच लढत झालेली आहे. 

ट्रेंडिंग बातमी - केज मतदार संघात भाजपची डोकेदुखी वाढणार? राखीव मतदार संघात कोण बाजी मारणार?

महाविकास आघाडीचा उमेदवार कोण? 

महायुतीमध्ये ही जागा कोणाला जाणार हे अजून ठरले नाही. मात्र महाविकास आघाडीत ही जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षातही इच्छुकांची गर्दी आहे. सोनाई उद्योग समूहाचे संचालक आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने यांनी शरद पवारांकडे उमेदवारी मागितली आहे. तर पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान संचालक आणि इंदापूर बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे हे ही इंदापूर विधानसभेतून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. मात्र महायुतीच्या घडामोडींवर शरद पवारांचे बारीक लक्ष आहे. त्यानुसार पवार निर्णय घेतील असे सांगितले जाते. ऐन वेळी हर्षवर्धन पाटील हे शरद पवारांकडे येतील असेही बोलले जात आहे. तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतून इंदापूर विधानसभेतून महायुतीचा उमेदवार पिछाडीवर होता. राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांना मोठी आघाडी या मतदार संघातून मिळाली होती. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाची उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे.  

ट्रेंडिंग बातमी - भास्कर जाधवांना गुहागरमध्ये कोणाचं आव्हान? स्वत: लढणार की मुलासाठी जागा सोडणार?

2019 च्या निवडणुकीत काय झालं? 

इंदापूर विधानसभेची 2019 ची निवडणूक ही दुरंगी झाली होती.यामध्ये प्रामुख्याने महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी निवडणूक होती. 2014 च्या पराभवानंतर 2019 ला महाविकास आघाडीत जागा वाटपात इंदापूरची जागा ही सत्तारूढ आमदार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेली होती. त्यामुळे नाराज झालेले हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसला सोडचिट्टी देत भाजपचं कमळ हाती घेतलं. हर्षवर्धन पाटील हे भाजपच्या कमळ या चिन्हावर महायुतीमधून निवडणूक लढले. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणे यांना 1 लाख 14 हजार 960 मते मिळाली. तर  हर्षवर्धन पाटील यांना 1 लाख 11 हजार 850 मते मिळाली. चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांचा 3 हजार 110 मतांनी पराभव झाला होता. 

ट्रेंडिंग बातमी - शिवसेना विरूद्ध शिवसेना! आमदार बालाजी किणीकरांचा विजयरथ कोण रोखणार?

मतदार संघाचा इतिहास काय? 

1952 सालापासून शंकरराव बाजीराव पाटील यांनी इंदापूर तालुक्याचे नेतृत्व केले. 1980 च्या निवडणूकीत राजेंद्रकुमार बाबूराव घोलप हे तालुक्याचे आमदार झाले.तर 1985 ते 95 या दशकात गणपतराव सीताराम पाटील यांच्या हाती जनतेने इंदापूर तालुक्याची सूत्रे सोपावली. यानंतर 1995 पासून हर्षवर्धन पाटील नावाचं पर्व इंदापूर तालुक्यात सुरू झालं. 1995 ला हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्याची पहिली निवडणूक अपक्ष लढवली. त्यावेळी हर्षवर्धन पाटील यांचे चिन्ह हे भिंतीवरील घड्याळ होतं. त्यानंतर 1999 आणि 2004 ला हर्षवर्धन पाटील यांनी विमानाच्या चिन्हावर अपक्ष म्हणून इंदापूर विधानसभेची निवडणूक लढवली. विजयी होत थेट विधीमंडळात पोहचले. तर 2009 ला हर्षवर्धन पाटील हे काँग्रेस पक्षातून निवडून आले होते.  2014 ला ही हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेस मधूनच निवडणूक लढवली मात्र यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला.तेव्हापासून इंदापूर तालुक्याची धूरा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे.

Switch To Dark/Light Mode
Previous Article
महाविकास आघाडीत नव्या पक्षाची एन्ट्री होणार? 'त्या' नेत्याच्या वक्तव्याने खळबळ
हर्षवर्धन पाटील लढणार की माघार घेणार? इंदापूर विधानसभा कोणाच्या पारड्यात?
Vidhansabha Election 2024 gopaldas-agarwal-vs-vinod-agarwal-battle in gondia-assembly
Next Article
गोंदिया विधानसभेत कमळ फुलणार? दोन अग्रवाल एकमेकांना भिडणार?