मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आता चांगलीच वादात सापडली आहे. या योजनेची घोषणा अर्थसंकल्पात अर्थ मंत्री अजित पवार यांनी केली. त्यानंतर मुख्यंत्र्यांनी शनिवारी विधानसभेत या योजने बाबतचा जीआर काढल्याची माहिती सभागृहाला दिली. शिवाय विधानसभा अध्यक्षांनीही ते वाचून दाखवले. यावर आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आक्षेप घेतला आहे. ही कृती म्हणजे हक्कभंग असल्याचे त्यांनी सांगितले. अजून अर्थसंकल्पाला मान्यता मिळालेली नाही. तरीही मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत येवून त्याची पुन्हा घोषणा केली. हा प्रकार काय आहे असा प्रश्नही वडेट्टीवार यांनी केला आहे. शिवाय अर्थ मंत्र्यांच्या अधिकारातही मुख्यमंत्र्यांचा हा हस्तक्षेप आहे असेही ते म्हणाले. त्यामुळे मुख्यमंत्र्यां विरोधात हक्कभंग आणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विधानसभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना जुलै महिन्यात लागू होईल. त्याचा तातडीने लाभ मिळण्यास सुरूवात होईल.त्याचा जीआरही काढला गेला आहे अशी माहिती विधानसभेत दिली. मात्र यानंतर विरोधी पक्षाने यावर जोरदार पलटवार करत मुख्यमंत्र्यांचीच कोंडी केलीय. हा प्रकार म्हणजे श्रेयवादाची लढाई आहे. शिवाय यात मुख्यमंत्री कुरघोडी करत आहेत असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. असा जीआर दाखवणे खरोखर योग्य आहे का? हा हक्कभंग होत नाही का? असा प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. नव्या योजनेचा लेखा शीर्ष तयार झालेला नाही. योजनेसाठी साडेचार हजार कोटी लागणार आहेत. त्याची तरतूद कुठून करणार हे माहित नाही. शिवाय जीआर पाहील्यानंतर राज्यातल्या केवळ पंधरा ते वीस टक्के महिलांनाच याचा लाभ होईल असे दिसते. हा महिलांचा अपमान आहे. त्यामुळे ही कसली लेक लाडकी योजना असे वडेट्टीवार म्हणाले. त्यामुळे याबाबत आपण हक्कभंग मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
ट्रेंडिंग न्यूज - LIVE : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली 'मुख्यमंत्री तिर्थदर्शन' योजनेची घोषणा
मुख्यमंत्र्यांनी तिर्थदर्शन योजना घोषणा केली. राज्याचे बजेट जाहीर झाले. त्यात ही योजना का नव्हती. त्याला अर्थमंत्री अजित पवारांनी विरोध केला होता का? असा प्रश्नही वडेट्टीवार यांनी विचारला. सध्या लोकसभा निवडणुकीच्या पराभवाचं खापर कोणावर फोडायचं यावरून महायुतीत भांडण सुरू असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. दरम्यान विधानसभा निवडणुकीत जनतेने या सरकारला डोळा मारण्याचा निर्णय घेतला आहे. अडीच वर्षे सरकारने केवळ जनतेची फसवणूक केली आहे. टेंडकबाजी, कमिशनबाजी राज्यात सुरू आहे. योजनांचा पाऊस पाडला आहे. पण सरकारकडे पैसे नाहीत. यातून काही फारसं होईल असं वाटत नाही असेही ते म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world