अमजद खान
पहलगाममध्ये हल्ला झाला. त्यात महाराष्ट्रातल्या पर्यटकांना आपला जीव गमवाला लागला. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काश्मीरला गेले होते. तिथे जावून त्यांनी महाराष्ट्रातल्या पर्यटकांची चौकशी केली. त्यांना मदतीचा हात दिला. अनेक पर्यटकांना खास विमानाने मुंबईला पाठवलं. जखमींची विचारपूस ही केली. याचे व्हिडीओ ही समोर आले होते. मात्र त्यानंतर ते थेट कुडाळला एका सभेला गेले. त्यावरून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. ही टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काश्मिरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील तिघांचा मृत्यू झाला. तिघांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी शिवसेना नेते विनायक राऊत, राजन विचारे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे गेले होते. त्यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टिका केली. एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता, तुम्ही श्रीनगर मधून थेट गोव्याला गेलात. गोव्याहून कुडाळला गेलात. रात्री साडे दहा ते साडे अकरा पर्यंत जल्लोष करुन फटाके फोडून ढोल वाजवित होता. हार तुरे स्विकारात होता. हे तुम्हाला शोभतं का असा प्रश्न राऊत यांनी शिंदेंना केला आहे.
तुमच्यातील संवेदना मेली होती का ? तुम्हाला असे वाटले नाही का, शहिदाना भेटून आलं पाहिजे. पहलगामला जाऊन आलात. तिथली विदारक दृश्य पाहिले. एकीकडे तिकडे जाऊन आश्रु ढाळायचे, इकडे येऊन कुडाळला आनंद साजरा करायचा हे रुप एकनाथ शिंदे यांचे आहे, असा हल्लाबोल राऊत यांनी केला. संपूर्ण देश या हल्ल्यानंतर दुखात होता. अनेकांनी आपल्या जवळची लोकं गमावली. महाराष्ट्रातील पर्यटकांचाही यात मृत्यू झाला. तरीही शिंदे असं वागले असं राऊत यावेळी म्हणाले.
दरम्यान पाकिस्तानचे साडे पाच हजार पैकी 107 नागरीक महाराष्ट्रातून बेपत्ता आहेत. हे नागरीक अतिरेकी होण्यासाठी गेले आहेत का ? याचा शोध महाराष्ट्र सरकारने घेण्याची आवश्यकता आहे असा टोलाही त्यांनी सरकारला यावेळी लगावला आहे. काश्मिरमध्ये सुरक्षा व्यवस्था का नव्हती असा प्रश्नही त्यांनी केला. शिवाय या हल्ल्याला सरकार आणि गुप्तचर यंत्रणाही जबाबदार आहे असं ते म्हणाले. हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांना शहिदांचा दर्जा द्या, शहीदाला उपलब्ध असलेला सर्व मानसन्मान त्यांना द्या अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. नोकरी आणि 25 लाखांची मदत द्यावी असं ही ते म्हणाले.