भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यांनी इचलकरंजीचा उल्लेख थेट पाक व्याप्त काश्मीर असा केला आहे. सांगलीच्या वाळवा इथे क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांचा जयंती समारंभ होता. त्यावेळी बोलताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदार संघातून शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने हे विजयी झाले. या मतदार संघात इचलकरंजी विधानसभा मतदार संघही येतो. हा मतदार संघ म्हणजे पाकव्याप्त काश्मीर आहे असे वक्तव्य हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे. निवडणुकीवेळी अनेक घटक अॅक्टीव्ह होते. सर्व प्रकारची यंत्रणा राबवली जात होती. त्यात इचलकरंजी सारख्या पाकव्याप्त काश्मीर असलेल्या मतदार संघाचाही समावेश होता असे पाटील म्हणाले. अशा वावटळातही यशाचा दिवा धैर्यशील माने यांनी लावला असेही हर्षवर्धन पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी माने यांचे अभिनंदनही केले.
हातकणंगले लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने यांनी विजय मिळवला होता. या मतदार संघात तिरंगी लढत झाली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, शिवसेना ठाकरे गटाचे सत्यजीत पाटील आणि धैर्यशील माने यांच्यात तिरंगी लढत झाली होती. यात धैर्यशील माने यांनी निसटता विजय मिळवला. शिवसेना ठाकरे गटाचे सत्यजीत पाटील यांचा तेरा हजार मतांनी पराभव झाला होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world