लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत. आता विधानसभेची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीला जबर धक्का देत विजय नोंदवला. असं असलं तरी विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचा उत्साह दांडगा आहे. पक्षाचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानसभा निवडणुकीत काय होईल हे स्पष्ट केले आहे. शिवाय पुढचा मुख्यमंत्री कोण याचे नावच जाहीर करून टाकले आहे. त्याच बरोबर शिवसेना शिंदे गटाला किती जागा जिंकता येतील याचे गणितच मांडले आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अब्दुल सत्तारांचे भाकीत काय?
महायुती सरकारमध्ये अब्दुल सत्तार हे मंत्री आहेत. त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीबाबत भाकीत व्यक्त केले आहे. आगामी विधानसभा निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती लढणार असल्याचे सत्तार यांनी स्पष्ट केले आहे. शिवाय महायुतीत पुन्हा सत्तेत येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. महायुतीत सत्तेत आली तर एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील असेही त्यांनी जाहीर करून टाकले आहे.
ट्रेंडिंग बातमी - Ajit Pawar : जीवात जीव आहे तोपर्यंत संविधानाला धक्का लागू देणार नाही : अजित पवार
भाजपकडे केली जागांची मागणी
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत आता जागा वाटपाची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना शिंदे गटाने भाजपकडे 90 ते 95 जागांची मागणी केली आहे. अशी माहिती अब्दुल सत्तार यांनी दिला आहे. तेवढ्या जागा मिळाल्याच पाहीजेत असे त्यांनी सांगितले. शिवाय या जागां पैकी 60 जागांवर आपला विजय होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. गेल्या काही महिन्या पूर्वी शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनीही शिवसेनेला 100 जागा मिळाल्याच पाहीजेत असे वक्तव्य केले होते. त्यामुळे आता महायुतीत जागांवरून रस्सीखेच सुरू झाली आहे.
लोकसभा निवडणुकीत काय झालं?
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाने 15 जागा लढवल्या होत्या. त्या पैकी त्यांना सात जागांवर विजय मिळवता आला. त्या पैकी मुंबईतल्या एका जागेवर अगदी थोडक्या मताने विजय संपादीत करण्यात आला. त्या तुलनेत ठाकरे गटाला 9 जागा जिंकता आल्या. असं असतानाही आमचा स्ट्राईक रेट जास्त आहे असा दावा शिंदे गटाने केला होता. शिवाय खरी शिवसेना ही आमचीच आहे असेही सांगितले गेल. आता शिंदे गटाने विधानसभेची तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सत्तारांनी पक्षाची पुढची नक्की रणनिती काय असेल याचीच चुणूक त्यांच्या वक्तव्यातून दाखवून दिली आहे.