‘अपना टाईम आ गया' हा संदेश देत धारावीत पहिल्यांदाच धारावी प्रीमियर लीगचा (डीपीएल) थरार रंगणार आहे. धारावीतील स्थानिक तरुण आणि धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट लिमिटेड यांच्या वतीने येत्या 31 मे ते 2 जून पर्यंत आयोजित करण्यात आलेल्या डीपीएलचा शानदार शुभारंभ सोहळा शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजता होणार असून सलग 3 दिवस क्रिकेट सामने रंगणार आहेत.
मिनी इंडिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीच्या गल्लीबोळात जागोजागी क्रिकेटचा डाव रंगलेला दिसतो. याच क्रिकेट प्रेमाचा धागा पकडून इथल्या स्थानिक तरुणांनी आयपीएलच्या धर्तीवर डीपीएल आयोजित केली असून एकूण 6 टप्प्यांमध्ये ही स्पर्धा पार पडणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कशी आहे स्पर्धा?
माटुंगा लेबर कॅम्प, शाहू नगर, सात चाळ, वाल्मिकी नगर, कमला रमण नगर या परिसराचा समावेश असलेल्या धारावीतील सेक्टर 1 मध्ये पुनर्विकास प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली असून याच ठिकाणी डीपीएलच्या पहिल्या टप्प्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर लवकरच इतर पाच टप्प्यांमध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात एकूण 14 स्थानिक क्रिकेट संघांचे सुमारे 200 हून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे प्रत्येकी 10 ओव्हर्सचे *हे सामने आयसीसीच्या टी -20 नियमावलीनुसार खेळवले जाणार असून थर्ड अंपायर आणि इतर अद्ययावत यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.
या संघांमध्ये साखळी सामने घेऊन रविवारी अंतिम सामना खेळवला जाणार आहेत. विजेत्या आणि उपविजेत्या संघाला आकर्षक ट्रॉफी आणि रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. या सामन्यांचे थेट प्रक्षेपण सोशल मीडिया आणि स्थानिक केबलवर केले जाणार असून सामने बघायला येणाऱ्या प्रेक्षकांना देखील आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत.
( नक्की वाचा : टी 20 विश्वचषक सेमी फायनलमध्ये हे 4 संघ पोहोचतील; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी )
डीपीएलमध्ये मनोरंजनाचा तडका
धारावी प्रीमियर लीगचे आयोजन आयपीएलच्या धर्तीवर करण्यात आल्याने खेळासोबतच मनोरंजनाची देखील विशेष काळजी घेण्यात आली आहे. धारावीतील रॅपर्स, मिमिक्री आर्टिस्ट यांच्यासह विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. तसेच याठिकाणी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स देखील उभारण्यात येणार आहेत.
“डीपीएल म्हणजे धारावीकरांनी धारावीकरांसाठी आयोजित केलेली स्पर्धा असून यातून स्थानिक खेळाडूंना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आमचा हेतू आहे. तसेच धारावी पुनर्विकास प्रकल्पाला समर्थन दर्शवत विकासाचा संदेश या स्पर्धेतून धारावीतील तरुण देणार आहेत. लवकरच धारावीत आणखी मोठ्या प्रमाणात डीपीएलचे आयोजन करण्याचा आमचा मानस आहे, '' असं टीम स्पिरिटचा कॅप्टन अदनान सय्यदनं सांगितलं.