पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सोमवारचा दिवस भारतासाठी निराशेचा ठरला. बॅडमिंटनमध्ये भारताचा युवा खेळाडू लक्ष्य सेन हा कांस्य पदकाच्या सामन्यासाठी खेळणार होता. तसेच स्किट नेमबाजी प्रकारात मिश्र दुहेरीमध्येही भारतीय जोडी पदकाच्या शर्यतीत होती. परंतु बॅडमिंटनमध्ये लक्ष्य सेनला मलेशियाकडून तर नेमबाजीत भारतीय जोडीला चीनकडून पराभव पत्करावा लागला. या सर्व प्रकारात भारतीयांना लक्ष्य सेनचा पराभव चांगलाच जिव्हारी लागला.
जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या मलेशियाच्या ली झी जियाविरुद्ध पहिला सेट जिंकत लक्ष्य सेनने चांगली सुरुवात केली होती. परंतु त्यानंतर अन्य दोन सेटमध्ये त्याचा खेळ खालावला. ली जियाने आपला अनुभव पणाला लावत उर्वरित दोन्ही सेट जिंकत भारताला पदकापासून वंचित ठेवलं.
लक्ष्य सेनच्या पराभवावर प्रकाश पदुकोण नाराज -
लक्ष्य सेनचा हा पराभव भारताचे माजी आणि दिग्गज बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांना रुचलेला नाहीये. लक्ष्यने केलेल्या खेळावर त्यांनी आपली जाहीर नाराजी बोलून दाखवत आपण निराश असल्याचं बोलून दाखवलं आहे. मागच्या आणि आताच्या ऑलिम्पिक स्पर्धेत जे काही निकाल लागले त्यासाठी आपल्याला संघटना आणि सरकारला दोष देता येणार नाही. त्यांना जे काही करणं शक्य होतं ते त्यांनी केलं आहे. परंतु मोक्याच्या क्षणी सर्वोत्तम कामगिरी करणं हे खेळाडूच्याच हातात असतं. त्यामुळे आता खेळाडूंनी याची जबाबदारी घेणं गरजेचं असल्याचं प्रकाश पदुकोण म्हणाले.
...मग ऑलिम्पिकमध्ये नेमकं काय होतं? - पदुकोण यांचा सवाल
सामना संपल्यानंतर बोलत असताना प्रकाश पदुकोण यांनी लक्ष्यच्या खेळाबद्दल निराशा बोलून दाखवली. लक्ष्यने चांगली सुरुवात केली होती. परंतु दुसऱ्या सेटमध्ये आघाडीवर असतानाही त्याला त्या गोष्टीचा फायदा घेता आला नाही. ऑलिम्पिकसारख्या पातळीवर खेळत असताना मानसिक दडपण हाताळण्यात आपण कमी पडत आहोत. यासाठी खेळाडूंनाच मेहनत घ्यावी लागणार आहे. साई (Sports Authority of India), TOPS सारख्या योजनेतून तुम्हाला सर्वकाही मिळत आहे, त्यामुळे आता तक्रार करता येणार नाही. अनेकदा खेळाडूंच्या अवास्तव गरजाही पूर्ण केल्या जात आहेत. अन्य स्पर्धांमध्ये याच खेळाडूंविरुद्ध भारतीय खेळाडू चांगला खेळ करत बाजी मारतात, त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये नेमकं काय होतं हे पाहणं आणि याचं उत्तर शोधणं गरजेचं असल्याचं पदुकोण म्हणाले.
बॅडमिंटन कोर्टवर ज्या ठिकाणी उतार असतो तिकडे लक्ष्य सेनचा खेळ चांगला होतो. परंतु जागेत बदल झाला की तो गडबडतो. यामध्ये त्याला सुधारणा करायची गरज असल्याचं प्रकाश पदुकोण म्हणाले. ऑलिम्पिकमध्ये जो खेळाडू आपल्यावर नियंत्रण ठेवू शकतो तो यशस्वी ठरतो. याच कारणामुळे दिग्गज खेळाडूंशी टक्कर घेत मनू भाकेरने स्वतःवर मानसिक नियंत्रण ठेवत दोन पदकं जिंकल्याचं पदुकोण यांनी स्पष्ट केलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world