जाहिरात

2024 Paris Olympic : आता बॅडमिंटनमध्ये पदकाचं 'लक्ष्य', पिछाडी भरुन काढत लक्ष्य सेन उपांत्य फेरीत

ऑलिम्पिकच्या (Olympic) इतिहासात लक्ष्य सेन (Lakshya Sen) बॅडमिंटन पुरुष एकेरीत उपांत्य फेरी गाठणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे.

2024 Paris Olympic : आता बॅडमिंटनमध्ये पदकाचं 'लक्ष्य', पिछाडी भरुन काढत लक्ष्य सेन उपांत्य फेरीत
मुंबई:

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एकीकडे पदकाची अपेक्षा असलेल्या भारतीय बॅडमिंटनपटूंच्या पदरी निराशा पडलेली असताना युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने इतिहास रचला आहे. पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत लक्ष्य सेनने पिछाडी भरुन काढत २-१ च्या फरकाने विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली आहे. ऑलिम्पिकच्या इतिहासात बॅडमिंटनमध्ये पुरुष एकेरीत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारणारा तो पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे.

लक्ष्यची सुरुवात खराब परंतु नंतर सावरला -

लक्ष्यने उपांत्यपूर्व फेरीत चीन तैपेईच्या चोऊ टीएन शेनवर १९-२१, २१-१५, २१-१२ अशी मात केली. सलामीच्या सेटमध्ये कडवी झुंज दिल्यानंतरही लक्ष्यला हार मानावी लागली. दुसऱ्या सेटमध्ये लक्ष्यचा प्रतिस्पर्धी आघाडीवर होता. परंतु मोक्याच्या क्षणी लक्ष्यने सामन्याची सूत्र आपल्या हाती घेत मुसंडी मारत सेट जिंकून सामन्यात बरोबरी साधली. यानंतर तिसऱ्या सेटमध्येही लक्ष्यने एकतर्फी सामना करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

उपांत्य फेरीसाठीही लक्ष्यसमोर कडवं आव्हान -

२०२१ सालच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत लक्ष्य सेनने कांस्यपदकाची कमाई केली होती. आपल्या संपूर्ण सामन्यात लक्ष्य सेनने आपल्या फटक्यांमध्ये स्पीड, आक्रमकता आणि अन्य स्किल्सचं कौशल्य दाखवत प्रतिस्पर्ध्याला नामोहरम केलं. उपांत्य फेरीत प्रवेश केला असला तरीही लक्ष्य सेनसमोरचं आव्हान अद्याप संपलेलं नाहीये. उपांत्य फेरीत त्याच्यासमोर २०२१ सालचा वर्ल्ड चॅम्पिअन सिंगापूरचा लोह केन येव किंवा डेन्मार्कच्या व्हिक्टर एलेक्सन यांच्यापैकी एकाचं आव्हान असणार आहे.

आतापर्यंत ऑलिम्पिक खेळांमध्ये परुपल्ली कश्यप आणि किदम्बी श्रीकांत यांनी अनुक्रमे २०१२ लंडन तर २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. पहिला सेट गमावल्यानंतरही लक्ष्य सेनने हार न मानता आपल्या प्रतिस्पर्ध्याला झुंजवलं. दुसऱ्या सेटमध्ये २-५ अशा पिछाडीवर पडलेला असताना लक्ष्यने आपल्या प्रतिस्पर्ध्याला आधी ५-५ आणि नंतर १५-१५ असं बरोबरीत गाठलं. यानंतर लक्ष्यने सढळहस्ते स्मॅश फटक्यांचा वापर करत चोऊ टिएन शेनला नामोहरम करुन सोडलं. यानंतर लक्ष्य सेनच्या फटक्यांचं शेनकडे उत्तर नव्हतं.

आज ऑलिम्पिकमध्ये भारताला पदकाची कोणाकडून आशा?

शनिवारच्या दिवशी भारताला ऑलिम्पिकमध्ये पुन्हा एकदा नेमबाज मनू भाकरकडून पदकाच्या आशा आहेत. २५ मी. पिस्टल प्रकारात मनू भाकरने शुक्रवारी पात्रता फेरीत धडाकेबाज कामगिरी करत दुसरं स्थान मिळवलं. आज दुपारी १ वाजता मनू भाकर पदकासाठी खेळेल. याव्यतिरीक्त तिरंदाजीत महिला दुहेरी आणि पुरुषांच्या स्किट शूटींगमध्ये भारताला पदकाची आशा आहे. परंतु यासाठी त्यांना पात्रता फेरीचा अडसर दूर करावा लागणार आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
Paris Olympic 2024: कांस्य पदक विजेत्या स्वप्नील कुसाळेला रेल्वेकडून पदोन्नतीचं गिफ्ट; दुपटीने वाढला पगार
2024 Paris Olympic : आता बॅडमिंटनमध्ये पदकाचं 'लक्ष्य', पिछाडी भरुन काढत लक्ष्य सेन उपांत्य फेरीत
paris-olympics-2024-three-medals-so-far-but-india-can-still-get-7-more-medals-know-all-contenders
Next Article
Paris Olympics 2024 : पॅरिसमध्ये भारत इतिहास रचणार, आणखी 7 मेडल मिळणार! पाहा कोण आहेत दावेदार?