Who is Akshara Gupta: बिहार क्रिकेटचा नवा स्टार वैभव सूर्यवंशी याने नुकतेच आयपीएल गाजवले आणि आता तो थेट टीम इंडियामध्ये पोहोचला असून सध्या सर्वत्र फक्त त्याचीच चर्चा सुरू आहे. पण, वैभव ज्या बिहारच्या मातीतून आलाय, नेमक्या त्याच बिहारमधून आता एका 15 वर्षांच्या मुलीने क्रिकेट जगतात असा काही धुमाकूळ घातलाय की तिची तुलना थेट वैभवशी केली जात आहे. भागलपूरच्या सँडिस कंपाऊंड मैदानावर या नव्या क्रिकेट वादळाने बीसीए महिला अंडर-19 वन-डे ट्रॉफी स्पर्धेत थेट ट्रिपल सेंच्युरी ठोकून इतिहास रचला आहे. अवघ्या 15 वर्षांच्या या मुलीने केलेल्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे ती आता महिला देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वात मोठा वैयक्तिक स्कोअर करणारी दुसरी महिला बॅटर ठरली आहे.
केवळ 126 बॉलमध्ये 306 रन
बिहारच्या या युवा बॅटरचं नाव आहे अक्षरा गु्प्ता. अक्षतानं मैदानात उतरल्यापासूनच प्रतिस्पर्धी बॉलर्सची अक्षरशः धुलाई सुरू केली. तिने फक्त 126 बॉलचा सामना करत नाबाद 306 रनची वादळी खेळी साकारली. या ऐतिहासिक खेळीदरम्यान तिचा स्ट्राईक रेट 242.86 चा होता आणि ती तब्बल 233 मिनिटे क्रीझवर पाय रोवून उभी होती.
अक्षराने आपल्या या इनिंगमध्ये 55 फोर आणि 8 उत्तुंग सिक्सर्स ठोकले. तिची दमदार बॅटिंग आणि अप्रतिम टाइमिंग यामुळे तिने अवघ्या 16 बॉलमध्ये आपले हाफ सेंच्युरी पूर्ण केले आणि फक्त 34 बॉलमध्ये सेंच्युरी ठोकून इतिहास रचला. अक्षराच्या या खेळीच्या जोरावर बीसीए महिला अंडर-19 टीम ए ने 40 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 450 रन का डोंगर उभा केला होता.
HISTORIC TRIPLE CENTURY! बिहार की बेटी का महा-रिकॉर्ड! 👑🏏🔥
— Bihar Cricket Association (@BiharCricAssoc) June 18, 2026
BCA महिला U19 टूर्नामेंट में अक्षरा गुप्ता ने इतिहास रचते हुए नाबाद 306* रनों की अविश्वसनीय पारी खेली है! 🚀💥
📊 रिकॉर्ड्स की सुनामी:
⭐ 126 गेंद, 306* रन (स्ट्राइक रेट: 242.86)
⭐ 55 चौके और 8 गगनचुंबी छक्के! pic.twitter.com/qw2QwgEoRM
इरा गुप्ताचा रेकॉर्ड अजूनही अव्वल
देशांतर्गत महिला क्रिकेटमध्ये सर्वात मोठा वैयक्तिक स्कोअर करण्याचा रेकॉर्ड मुंबईच्या इरा गुप्ताच्या नावावर आहे. इराने एका राज्यस्तरीय मॅचमध्ये नाबाद 346 रनची खेळी केली होती, ज्यामध्ये 42 फोर आणि 16 सिक्स समाविष्ट होते. आता तिच्यापाठोपाठ बिहारच्या अक्षता गुप्ताने नाबाद 306 रन करून या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे. या दोन्ही खेळाडूंचे स्कोअर आता महिला क्रिकेटच्या यादीत ऐतिहासिक मैलाचा दगड ठरले आहेत.
( नक्की वाचा : Vaibhav Sooryavanshi: भारतीय क्रिकेटमध्ये नव्या वादाची ठिणगी! वैभव सूर्यवंशीच्या यशावर काही खेळाडूंचा जळफळाट? )
चिकन दुकान चालवणाऱ्या बापाच्या लेकीचा संघर्ष
बिहारच्या रक्सौल येथील राहणाऱ्या अक्षराचा इथपर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. तिचे वडील राज किशोर शाह हे गावात चिकनचे दुकान चालवतात, तर आई रीना देवी गृहिणी आहे. वयाच्या अवघ्या 8 व्या वर्षी तिने पहिल्यांदा हातात बॅट धरली होती. सुरुवातीला कोणतीही अकॅडमी नव्हती किंवा कोणताही कोच नव्हता.
अक्षराच्या काकांनी तिची आवड ओळखून तिच्याकडून कसून प्रॅक्टिस करून घेतली. ती दररोज 5 तास प्रॅक्टिस करायची आणि गावात मुलांसोबत क्रिकेट खेळून तिने स्वतःला घडवले. लेकीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिच्या वडिलांनी घराशेजारील बागेत एक नेट लावून दिले होते. तर तिची आई तिला रोज सकाळी 5 वाजता उठवून रनिंगसाठी पाठवायची.
( नक्की वाचा : Shreyas Iyer : कोच गंभीरचा सल्ला धुडकावून निवड समितीला का केलं अय्यरला कॅप्टन? वाचा 4 प्रमुख कारणं )
14 व्या वर्षी मिळाली बिहारची कॅप्टन
अक्षराच्या आयुष्याला 2024 साली खऱ्या अर्थानं कलाटणी मिळाली. ट्रायल्स दरम्यान तिची बिहार अंडर-19 महिला टीममध्ये निवड झाली आणि अवघ्या 14 व्या वर्षी तिच्याकडे टीमची कॅप्टनशिप सोपवण्यात आली. अक्षरानं वयाच्या 14 व्या वर्षीच तिच्या शानदार परफॉर्मन्सच्या जोरावर बिहारच्या सीनियर महिला टीममध्येही जागा मिळवली होती.
विशेष म्हणजे, बीसीसीआयच्या वयोगट स्पर्धांमधील चारही प्रमुख फॉरमॅटमध्ये एकाच सीजनमध्ये (2024-25) खेळणारी ती देशातील पहिली महिला खेळाडू बनली आहे. अक्षराचा चुलत भाऊ ऋषभ हा देखील बिहार टीमकडून खेळतो आणि त्यालाच आदर्श मानून ती पुढे जात आहे.
असोसिएशनकडून कौतुकाचा वर्षाव
15 वर्षांचा अक्षराचा हा अद्भूत परफॉर्मन्स पाहून बिहार क्रिकेट असोसिएशनचे प्रेसिडेंट हर्षवर्धन यांनी तिचे कौतुक केले आहे. बिहारच्या महिला क्रिकेटपटू सातत्याने राज्याचे नाव उंचावत असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच असोसिएशन खेळाडूंना नवनवीन संधी आणि मंच उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत त्यांनी हा परफॉर्मन्स इतर युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास व्यक्त केला. असोसिएशनचे सेक्रेटरी झियाउल अर्फिन यांनीही तिला शुभेच्छा देत, स्पर्धेत अशी प्रतिभा समोर येणे हे बिहार क्रिकेटच्या उज्ज्वल भविष्याचे संकेत असल्याचे म्हटले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world